Saturday, 4 June 2022

Himalayan diary 27th Dec 2021

जंगलाला बर्फानी आपली श्वेत साडी नेसवलेली दिसली आणि पावलं विलंबत मधून द्रुत गतीत पडायला लागली. पळतपळतच गेलो. झाडांच्या कॅनोपी तुन बाहेर आलो. समोर बर्फ डोंगर उतारावर आणि पायवाटेवर आमची वाट बघत पसरला होता. मानवी स्वभावाप्रमाणे दूरच्या गोष्टींचं आकर्षण तस हिमालयातल्या लोकांना समुद्राचं आकर्षण आणि आपल्याला बर्फाचं. 


आपल्या सह्याद्री मधे प्रत्येक ऋतूत धरणीच रूप बदलत. पावसाळ्यात अखंड वाहणाऱ्या प्रपात आणि जलधारांमुळे ती भासते हिरव्या काठाचा शालू नेसलेल्या नव परिणिते सारखी. हिरवाई संपते आणि ती नेसते पिवळी जर्द साडी, जणू धगधगत्या सूर्यानी त्याच्या किरणांनी विणलेलं वस्त्रच तिला भेट दिलय. प्रत्येक ऋतूत तिचा साज वेगळा, बाज वेगळा . 

आणि हिमालय, सर्वात तरुण डोंगर रांग. तो भासतो ज्ञानेश्वरां सारखा. तारुण्याचा उंबरठा ओलांडण्याच्या आधीच संसाराचा उंबरा ओलांडून परमार्थात ध्रुवपद मिळवलेल्या योग्या सारखा. परम पवित्र, शांत, समाधिस्त. दोघांमधे किती साम्य. सह्याद्री कडून वीरश्री घ्यावी आणि हिमालयाकडून सुंदरता, सात्विकता. तिथल्या वातावरणातली शांतता कानांनी ऐकावी आणि हृदयात भरून घ्यावी, बकुळेच्या फुलांनी ओंजळ भरावी तशी. ओंजळ रीती केल्यावरही जशी ती सुगंधानी भरून जाते तस हृदय त्या शांततेनी भरून ठेवावं, मनात उठणाऱ्या वादळशी सामना करण्यासाठी.  त्याच सौंदर्य बघता बघता त्याचाच भाग बनून जाव.   

आता जंगलाच्या उबेतून स्वतःला बर्फाच्या गारव्याला स्वाधीन केलं. प्रत्येकवेळा प्रेमाचा स्पर्श उबदार थोडाच असतो. बर्फात गेलं कि तो थंडगार असतो. म काय, नाक गोठलं, बोट बधिर झाली, spinal cord tight झाली. त्यानी प्रेमात पार गोठवून टाकलं. पहिल्यावहिल्या बर्फात सगळ्यांचे थोडे फोटो काढले आणि पहिल्या कॅम्प वर पोचलो. भोंडल्या भोवती फेर धरल्या सारखे सगळे टेन्ट बेकलताल च्या शेजारी एका तलावा भोवती गोल करून बसले होते. 

मुंगीला सुद्धा तिथे adjust करायला अवघड गेलं असत अशी टेन्ट ची गर्दी झाली होती, म आम्ही आमची कॅम्प साईट डावी कडे जंगलात सेट केली. दोन झाडांच्या मधे जिथे जागा मिळाली तिथे टेन्ट लावले. झाडांच्या गर्दीमुळे वारा काहीसा सुसह्य झाला. हिमालयातल्या झाडांचा बाजच वेगळा. पर्वतांच्या उंचीशी स्पर्धा करता करता ती पण उंच झाली असावी. आजची हिमालयातली पहिली रात्र. आता तीन रात्रीं साठी आमची घर बदलली होती. २ BHK, ३ BHK वरून Two man tent,  Three man tent, Four man tent अशी झाली. मास्टर बेडरूम आणि हॉल एका 6 * 5 च्या टेंट मधे सामावले होते. टेन्ट मधे सॅक टाकून, फ्रेश होऊन बाहेर आलो तस वातावरण बदल्ल. बर्फाचे छोटेछोटे दाणे पडायला लागले, तापमान झर्रकन खाली आलं. उच्छवासातुन वाफा यायला लागल्या. आता सगळे जुन्या बॉलीवूड सिनेमातले सिगार आणि पाईप ओढणाऱ्या जगदीश आणि प्राण च्या character मधे गेले. हातात सिगार काय पण कधी बिडी पण न धरलेले तोंडातून भका भका धूर काढायला लागले. नुसता TP. रिमझिम snowfall मधे जेवण केलं. नंतर लगेचच वरच्या टेकडीवर सगळे चालायला निघालो. Acclimatization चा नियम climb high and sleep at low. टेकडीवर जाऊन थंडीत मस्त कुडकुडत एक रोप ऍक्टिव्हिटी केली. दुपारचं जेवण जिरायच्या आत भटारखान्यात रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु झाली. वातावरण कुंद होत, आभाळ पण भरून आलं होत. शेकोटी भोवती सगळे बसून मस्त आलं लसूण पेस्ट चा तडका मारलेलं गरमागरम सूप पित बसलो. त्या थंड वातावरणात अस सूप म्हणजे पावसात भजी खाल्ल्या सारखं सुख होत ते. 

मेस टेंट मधे जेवण करून सगके आपापल्या टेंट मधे पांगले. सगळे गाण्यांचे दर्दी लोक मुडात आले. ज्योती, डॉक्टर, श्रुतिका, मैथिली, प्रीति आणि माया सगळ्यांनीच मैफील जमवली आणि मधुरा नि तर त्यात बहार आणली. गाणी कधीच संपू नये असं वाटत होत. पण आजच्या hike नि थकले भागले जीव टेंट मधे परतले. 

गार वारा सुटला. हिमालयातली थंडी हाडात जायला लागली, बत्तीशी वाजायला लागली. आमचे पोर्टर्स आणि guide ह्या ढगाळ वातावरणामुळे चिंतेत होते. त्यांच्या मते रात्री heavy snow fall होण्याची शक्यता आहे आणि तस झालं तर उद्या ची movement त्रासदायक होईल. शेकोटी जवळ मी, डॉक्टर आणि प्रताप बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो होतो. रात्र जशी चढत होती तशी गप्पाची रंगत पण चढत होती. आम्ही हलेना म्हणून शेकोटीनी तिची ऊब आवरती घेतली म आम्ही पण कुडकुडत टेंट मधे शिरलो.

कधी आली, कुठून आली, कशी आली कळलं नाही पण साधारण 2 का 3 ला टक्क जाग आली. टेंट च्या बाहेर आलो तर वातावरण क्लिअर झालं होतं, आकाश लक्ष चांदण्यांनी गच्च भरलं होत, टीपूर चांदण देवदार च्या झाडीतून खाली घरंगळत येत होतं, त्यानी मस्त जमिनीवर रांगोळी रेखाटली होती. चांदण्यात चक्कर मारायला बाहेर पडलो. चंद्रप्रकाशाच्या परिसस्पर्शा नी बर्फाचा शुभ्र रंग अधिकच खुलला होता. हिमालयातला थंडगार वारा सुटला होता, थंडीमुळे सभोवार पाय पोटाशी घेऊन झोपला होता, देवदार ध्यानस्थ बसले होते, निरव शांतता होती.  आकाशाच्या घुमटात ग्रहतारे दाटीवाटीनी बसले होते, त्यामधून एक तारा पडला. जे हवय त्याच्याच विचारांनी मनात गर्दी करून ठेवली, हा हा म्हणता दोन तीन तारे पडले. त्यानी दिलेल्या दानानी झोळी जड झाली. भविष्यात पुर्ण होणाऱ्या इछ्यानच्या assurity मुळे मन सुखावल. 

आसमंतात विचारांचे तरंग नव्हते आणि आता मनातही, कारण मनाचा ताबा चंद्रानी घेतला. मनाचा स्वामी आहे ना तो. पृथ्वीचा हा भाग ह्या वेळी अवीट सौन्दर्यानी नटला होता. सगळी सृष्टी स्वप्न जगात निद्रिस्त होती आणि मी स्वप्नवत जगत होतो. कृष्णमेघ कुंटेनच्या पुस्तकातलं वाक्य आठवलं '' काही मोजके क्षण काय ते आयुष्य असत, बाकी आयुष्य म्हणजे नुसता भारा असतो ". वाचलेलं अनुभवत होतो, त्या अवीट गोड आणि पवित्र सौन्दर्यानी भारलेल्या क्षणांचा साक्षी होतो. 

|| कृष्णार्पणमस्तू ||