कोथळीगड


दर सोमवारी शहराची वेस ओलांडून डोंगरांची कूस जवळ करायचीच असा निर्धार केला. कोणाला विचारायच्या आतच शमी नि विचारलं, ''जीजू , gym ला सुट्टी आहे तर कुठे ट्रेक ला जायचं का ?'' अशी असते विश्वमनाची किमया. एक विचार तरंग कैक मनात उमटतो आणि त्यांची मोट बांधतो. मी लगेच रुकार दिला. बरेच वर्ष पहायचा राहिलेल्या पेठ कडे मोर्चा वळवला. खाण्याच्या जुजबी गोष्टी घेऊन रामप्रहरी पुणे स्टेशन गाठलं. ६ ची सिंहगड पकडली. दोन तासात ट्रेन नि आम्हाला कर्जतला पोचवलं. आमराईतून बसेस जातात म्हणून वेळ न घालवता तडक आमराईत गेलो. कर्जत आणि वडा हे समीकरण शोलेतल्या जय आणि वीरू सारखंच आहे. म काय वडापाव चेम्बवून आंबवली च्या ST ची वाट पाहत बसलो. आणि 'ती' आली. जातिवंत trekker ला Mercedes Benz पेक्षा लाल चुटुक लाल डब्ब्या वरच अधिक प्रीती असेल. 

वैजनाथ च्या वेशी वरून गाडी चालली होती. काही ठिकाणांचे आणि आपले ऋणानुबंध असतात. नुसतं त्यान्च्या आठवणींनी मन आनंदून जात. त्यांच्या सानिध्यात, तर काय विचारायच. आई च अजोळ म्हणून असेल कदाचित, पण वैजनाथ चा आणि आम्हा मावस-मामे भावंडांचा असाच ऋणानुबंध. कडावच्या गणपती ला डब्ब्यातूनच नमस्कार केला. एक एक गाव मागे टाकत. कोणाला सोडत तर कोणाला घेत कोठिंबे मागे टाकलं. लहानपणी आई आणि मावशी बरोबर मी आणि अभिजित बैलगाडीतून कोठिंब्या ला आलो होतो. ती बैलगाडीतली bumping सफर, विहिरी वरची अंघोळ नंतर आमरसाचा जेवण. कोठिंबे ची पाटी वाचली आणि हे सगळं स्मृतींच्या गाठोड्यातून डोळ्या समोर तरळलं. कडावच्या गणपती ला प्रार्थना केली, 'बाप्पा, शेवटपर्यंत अशा सुंदर आठवणींची स्मृती राहूदे'. 
९. ३० च्या आसपास आंबवली त पोचलो. जेवणाची सोय करून पेठवाडी ला मार्गस्थ झालो. पायथ्याच्या पेठवाडी पर्यंत कच्चा रस्ता आहे. 'अ' कार 'उ' कारात मिसळावा तसा डांबरी रस्ता मातीच्या रस्त्यात लुप्त झाला. पाऊल बुडेल येवढी माती होती.


लाल डब्यातून येताना चेहरे मातीनी माखलेच होते अता बूट आणि ट्राउजर पण माखली. शहरातल्या पांढर पेशींना कडक इस्त्री चे कपडे, पॉलिश केलेले चकाचक बूटांच कौतुक असेल, आणि असावं पण. पण आमच्या लेखी ट्रेक करून करून फाटलेले बूट आणि धुळीनी माखलेले कपडेच भारी. कोणाला हे भिकेचे डोहाळे वाटतील पण ट्रेकर साठी हि लेणीच आहेत. आम्ही आडवाटेच्या पंथाचे पथिक, काय करणार.

उन्हाळा माध्यानीच्या उंबरठ्यावर होता. पान आणि फांद्यांचा विरह झाला होता, वणवा जमिनीची मशागत करत होता. झाड विदाउट मेकअप होती. तरी माधुरी, मधुबाला सारखीच सुंदर दिसत होती. निसर्ग नजर तयार करतो म प्रत्येक ऋतूतल सौंदर्य उलगडतं जात.

बिल्वा आणि शमी सख्या बहिणी शोभतात. एकतर हे चार पायांच्या प्राण्यांकडे खेचले जातात, नाही तर ते प्रणीतरी ह्यांना बोलावून घेतात. ह्यांचं गोटमेट काही कळत नाही. रस्ता चुकलो आणि थेट एका गोठ्यात शीरलो. दोन अडदांड बैल आणि एक गोंडस वासरू दावणी ला बांधून ठेवलं होत.  २५ वेळा चल चल करून शमी ला तिथून बाहेर काढावं लागलं. बिल्वा पण असतीतर तिला सांगून सांगून माझ्या तोंडाला बैला सारखा फेस आला असता. एका ताइ ने गडाच्या वाटेला लावलं.


कृष्णाच्या मुकुटात जस मोरपीस शोभतं तस गडाच्या शिरपेचात भगवा शोभत होता. झाडांची दाटी संपली, जस चढणी ला लागलो तशी ती विरळ होत गेली. मिळेल तशी सावली पकडून पाणी प्यायला बूड टेकवलं. समोर तुंगी चा डोंगर, भीमाशंकर च पठार आणि त्याच्या पोटातला पदरगड दिसत होता. डोंगरांच्या सावलीतली झाड दुपारची वामकुक्षी घेत होती. १२ च्या आसपास गडाच्या पायाशी आलो. दोन देखण्या तोफांनी आणि एक उमद्या बुरुजानी आमचं स्वागत केलं. गडात प्रवेश केला. एकसंध पाषाण कोरून कारागिरांनी जिना काढलाय. डावीकडे एक आणि उजवी कडे वर दोन खोल्या आहेत. देवडी म्हणण्यासारखी न त्यांची जागा न रचना. ह्या कारागिरांचा आणि विश्वकर्म्या चा DNA समान असणार, त्या शिवाय पाषाणात फुल फुलवायची किमया कशी साधणार. आघात करणाऱ्यात पण जर संयम असेल तर सौंदर्य उमलणारच. म तो दगडावर असो वा मनावर. 

हा लढाऊ किल्ला नाही, फक्त एक संरक्षक ठिकाण, म्हणून प्रशस्त असा दरवाजा नाही. संभाजी महाराजांच्या काळात इथे मराठ्यांचं शस्त्रागार होत. वाड्याच्या छोट्या दिंडी दरवाज्यासारख्या छोटेखानी दरवाज्यातून प्रवेश केला. शेजारच्या भिंतीवर शरभ आणि हत्ती गडाच्या संरक्षणाला सज्ज होते. गडाचा पसारा आटोपशीर. दोन हाकेच्या अंतरा एवढाच. माथ्यावर पाण्याची टाकी आणि सदर वा वाड्याची ज्योत कायतिफक्त शिल्लक आहेत. आल्या वाटेनी गड उतरायला लागलो तर, चार पायांचे तीन प्राणी समोर आले, 'my old enemy', कुत्री. त्यांच्या बरोबर बिस्कीट आणि फळ खाऊन गडाला प्रदक्षिणा मारली. रूखवतीतल्या ताटा भोवती जशी महिरप शोभते तशी पूर्ण गडा भोवती पाण्याच्या टाक्यांनी महिरप केली आहे.

प्रदक्षिणा पूर्ण करून परत तोफेंपाशी आलो. दगडात बसवलेला लाकडी दरवाजा आणि ह्या तोफा कोण्या स्वयंसेवी संस्थेनी जतन केल्या आहेत. गड उतरताना रस्ता मारुतीच्या शेपटी सारखा लांब लचक झाला होता, संपता संपेना. सूर्य आग ओकत होता, पक्षी दाट झाडीत जाऊन गुपचूप बसले होते, पोटात मात्र कावळे गलका करायला लागले. हाटेलात जाऊन मस्त भरल्या भेंडी वर आणि अंडा करी वर आडवा हात मारला. हातावर पाणी पडल्या पडल्या तडक जवळ असलेली पांडव लेणी पहायला निघालो. वाटेत एकाला रस्ता विचारला तर त्यांनी आम्हाला ट्रिप्सी थेट लेण्यां पर्यंत सोडलं.


कड्याच्या पोटात प्रशस्थ लेणी कोरली आहेत. आत मिट्ट काळोखात राधाकृष्ण, विष्णूलक्ष्मी, गणपती बाप्पा, सठीसहामाशी येणाऱ्या भक्तांसाठी उभे आहेत. समोरच्या बंधाऱ्यावर म्हशिवानी मनसोक्त डुंबलो. वारा पाण्याला साद घालत होता ते पण थुई थुई नाचून त्याला प्रतिसाद देत होत, मधूनच एक बगळा चोचीनी पाण्यावर रेघ काढत वरचे वर उडत होता, सभोवार निरव शांतता होती, दगडांवर आदळणाऱ्या लाटांचा चुबळुक चुबळुक आवाज येत होता. मागे बंबाळ रान तर समोर तुंगी, पदरगड आणि भीमाशंकर च पठार भर उन्हात ध्यानस्थ बसले होते.


पहाट, सकाळ, संध्याकाळ आणी रात्र ह्यात प्रत्येकालाच सौंदर्य दिसत असेल. पण दुपार, तीच काय? जसा पक्षांमध्ये कावळा दुर्लक्षित तस भाग्य दुपारच्या माथी आलय. ज्ञानेश्वरांनी ओजस्वी शब्दात कावळ्याला उद्धरवल, तस पाडगावकरांची ''दुपार'' वाचली आणि 'तिच्या' प्रेमातच पडलो. आज बऱ्याच वर्षांनी 'ती' माझ्या समोर उभी होती. नेहमी सारखीच, साधनामस्त. ३ km चालत आंबवली त पोचलो. एस.टी ची वाट न बघता टमटम नि कर्जत गाठलं.

आजचा दिवस सार्थकी लागला. चार श्वासांनी नक्की आयुष्य वाढलं असणार, डोंगरां साठी.

।। कृष्णार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment