गड

अमावस्या नुकतीच होऊन गेली होती. तरी पहाटे मिट्ट काळोख नव्हता. बऱ्याच दिवसांच्या गॅप नी सिंहगडाच्या वाटेवर आलो होतो. 

बऱ्यापैकी उंचीवर आल्यावर समोरच्या डोंगराआडून, मारुती सारखा अंगभर शेंदूर फासून सुर्व्या कलेकलेनी वर येत होता. आपण भगव्याला परमपवित्र का मानतो याची अनुभूती यावी असा त्याचा रंग दिसत होता. भविष्यात हा भूतकाळातला क्षण पाहून मनाला आनंद मिळावा म्हणून मोबाईल मधे फोटो काढत होतो, पण ह्या नादात खरा क्षण अनुभवण्याचा निसटत होता. परफेक्ट फ्रेम यावी म्हणून  बुड जमिनीवर टेकवलं. क्लिक करून बऱ्याचवेळ तसाच बसलो. जमिनीवर बसण्यात काय सुख आहे. अगदी आई च्या मांडीत बसल्या सारखं. Such a warm feeling. आपोआप 'ग्रॉउंडिंग' होतहोत. शरीरातली, मनातली, विचारातली, भावनां मधली सगळी टॉक्सिसिटी ' ती आई ' खेचून घेत होती आणि मला बॅलन्स करत होती. 

डोळ्यांना डोंगर, दरी, झाड, पान सुखावत होती. शरीराशी गार वारा खेळत होता. नाकात झाडांचा सुगंध दरवळत होता. कानांवर वाऱ्याची गाणी आणि पक्ष्यांच्या कविता येत होत्या. ह्या सुखातिरेकानी आवंढा गिळला. निसर्गा नि पाची सेन्सेस ला कामाला लावलं. उठेसपर्यंत सुर्व्यानी ऑरेंज कलरचे कपडे बदलून फिकट पिवळया रंगाचे कपडे घातले. लग्नकार्यात बायका जेवढ्या फास्ट साड्या बदलतात त्यांच्या पेक्षाही फास्ट हा तयार होत होता. 

डावीकडच्या दरीतून भारद्वाज साद घालत होता, एक 'टकाचोर' (rufous treepie) माझ्या पुढ्यातन उजवीकडच्या दरीत गेला. कोणत्यातरी पक्ष्याची टकळी अखंड सुरु होती. टिपेच्या आवाजावरून  आणि वारंवारतेवरून ती नक्कीच female असणार. 

नुकताच पाऊस पडून गेला असावा. सारवलेल्या ओसरीवर रांगोळीसाठी पाणी शिंपडल्यासारखी जमीन तुकतुकीत दिसत होती. एका पावसानी सगळं निसर्गचित्रच बदलत. विचारांच्या मागे धावणं सोडलं कि जसा विचारांचा धुरळा खाली बसतो तसं पावसाच्या शिडकाव्यानी वातावरणातली धूळ खाली बसून दूरवरच लख्ख दिसत होत. राजगड-तोरणा एकमेकांकडे कौतुकानी पहात बसले होते. कल्याण अजून साखरझोपेत होत. दूरवर पुरंदर आणि वज्रगड ठाण मांडून बसले होते. हे निसर्गचित्र फार गोमट होतं आणि त्या आसमंतात कुठेतरी माझी पण छोटीशी जागा राखून ठेवली होती. 


।। कृष्णार्पणमस्तु ।। 


 


    

16 comments: