"समिट बीड" एव्हरेस्ट ची.

आतकरवाडीतून चालायला सुरवात केली आणि पोचलो गडावर, असं हिमालयामधल्या मोहिमांच नसत. पायथ्या पासून शिखरा पर्यंत जाताना मधे लावायला लागणाऱ्या कॅम्प मध्ये योग्य तेवढा अन्नसाठा आणि गिर्यारोहण साधनांचा साठा करावा लागतो. त्यासाठी त्या त्या कॅम्पवर जाऊन परत बेसकॅम्प वर यावं लागत. अश्या रोटेशन्स मुळे तिथल्या विरळ आणि कमी दाबाच्या वातावरणाशी आपलं शरीर मिळतजुळत होत. मग शरीर आणि मनाची तयारी झाली कि शिखर चढाई साठी योग्यदिवस निश्चित करून, पंचांगात बघून नाही तर हवामानाचा अभ्यासकरून निश्चित केला जातो. मग सुरु होते "समिट बीड". 

अजून 'वेदरविंडो' मिळत नव्हती.  २६,००० फुटांवर Jet च्या गतीने वारे वाहत असतात ज्याचा वेग ताशी १८० ते २५० km असतो, ह्याला Jet Stream म्हणतात. मे महिन्यातील २.३ दिवस हे Jet Stream गिर्यारोहकाला शिखरचढाई साठी सुसह्य असतात, ह्याला म्हणतात वेदरविंडो. 

दिवसांमागून दिवस चालले होते. वेदरविंडो मिळत नसल्याने बेसकॅम्प वर अस्वस्थता पसरली. गिर्यारोहक आणि patience म्हणजे खरंतर 'चोली दामन का साथ', पण आता patience चा patience पण संपायला आला.  कोणता संघ समिट साठी एक तारीख चांगली आहे तर दुसरा संघ दुसरी तारीख चांगली असल्याच सांगायचा. भारतीय हवामानखाते, दिल्ली मधून डॉ. बि. पि. यादव आम्हाला रोज ई-मेल नि हवामानाचा अंदाज पाठवत होते. त्यांच्या रिपोर्ट चा अभ्यास करून मामानी १९ मे हि तारीख समिट साठी निश्चित केली आणि सगळ्यांच्यात नवचैतन्य संचारलं. १६ मे ला आमची "समिट बीड" सुरु होणार होती.

मनावर थोडं दडपण आलं होत पण, महेश, निलेश आणि ताटे काकांशी बोलून रिफ्रेश झालो. संध्याकाळी गणपती बाप्पा आणि स्वामींची आरती केली. मागची दोन वर्ष फ्लॅशबॅक सारखी डोळ्यासमोरून तरळून गेली. हजारो लोकांनी हि मोहीम उभी करण्यासाठी जीवाचं रान केलं होत. निर्भेळ यशासाठी आम्हाला आशीर्वाद आणि प्रार्थनेची कवचकुंडल घातली होती.

पुढचे काही दिवस म्हणजे दोन वर्ष केलेल्या साधनेची फलश्रुती असणार होते.

१६ मे २०१२

झोप लागली का नाही हे नक्की आठवत नाही पण, दोन वाजता एकदम फ्रेश जाग आली. " समुद्र वसने देवी..... " म्हणून जमिनीला स्पर्श केला, 'तुझ्या सर्वोच्च स्थानी नेऊन सगळ्यांना सुखरूप खाली आण' अशी प्रार्थना केली आणि जामानिमा करून टेन्ट च्या बाहेर आलो. बेसकॅम्प ला -१०°C, -१५°C तापमान नित्याचाच, पण आज वारापण सुटलाच होता. पिठाच्या गिरणीत जस पिठ उडत असत तसा वाऱ्याबरोबर बर्फाचे कण सर्वत्र उडत होते. हेडटॉर्च चा उजेड दहा फुटांवर एक सेंटीमीटर पण लांब पडत नव्हता. डायनिंग टेन्ट मधून पाणी पिऊन बाहेर येईसपर्यंत बर्फाचा धांगडधिंगा संपला होता. वातावरण निवळलं होत. 'खुंबू आईसफॉल' मध्ये गिर्यारोहकांची हालचाल सुरु झाली. त्यांच्या हेडटॉर्चनी आईसफॉल मधला रूट अधोरेखित केला होता. अंधाराच्या पार्श्वभूमीवर ते लाईट म्हणजे जणू एव्हरेस्ट नि आमच्या स्वागतासाठी दिव्यांची आरास केल्यासारखी वाटत होती. तीन वाजेसपर्यंत सगळे डायनिंग टेन्ट मधे जमा झाले. आमच्या कोणाच्याच चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता पण, विचारांचं मणभर ओझं मनावर होत. घश्याखाली जात नसताना फक्त गरज म्हणून नाष्टा केला. सगळ्यांची गळाभेट घेतली. मामाच्या चेहऱ्यावर दडपण होत पण आवाजात कमालीचं मोटिवेशन होत. ताटे काकांच्या मिठीत आई ची माया होती. 

आमचे कूक, सगळा सपोर्टींग स्टाफ आम्हाला ऑल द बेस्ट द्यायला आला. पूजेसाठी उभारलेल्या स्तूपाला नमस्कार करून ते उजव्या हाताला ठेवत चालायला लागलो. सगळे आम्हाला 'क्रॅम्पॉन पॉईंट' पर्यंत सोडायला आले. रामाचं नाव घेऊन 'खुंबू आईसफॉल' मध्ये पाऊल टाकलं. हिमखंडांना वळसे घालत आम्ही सापासारखे चाललो होतो. श्वासांनी जशी पयांची लय पकडली तशी विचारांची लय तुटत चालली होती. तापमान कमी असल्यामुळे बर्फ कडक होता, त्यामुळे आम्हाला सहज चालता येत होत. खुंबू आईसफॉल म्हणजे सापशिडीच्या पटासारखा आहे. 

अंतहीन हिमभेगा तोंड विस्फारून बसलेल्या सापांसारख्या, गिळायला सदैव तत्पर, अर्थात आपण गाफील राहिलो तरच. आणि शिड्या म्हणजे, सुखरूपपणे या तीरावरून त्या तीरावर नेणाऱ्या नावाड्यासारख्या. पण ह्या मृत्यूच्या कराल दाढेसारख्या भासणाऱ्या हिमभेगांच सौंदर्यपण मोहिनी घालणार. काय त्यांचे आकार, आतल्या निळसर रंगांच्या छटा, त्यांच्या खोलीत मिट्ट होत जाणारा गडद अंधार, क्या बात है. 

हिमभेग क्रॉस करताना लॅडरच्या मधोमध असताना हे सर्व बघण्याची मजा काही औरच आहे. गिर्यारोहकांचा आनंद, सुख सगळच अनगड गोष्टींमध्ये सामावलेल. कोणत्या ग्रहावरुन हि जमात आली काय माहित. आता हेडटॉर्च बंद करण्याची वेळ आली. प्रकाशाने अंधाराला त्याचा खेळ आटोपता घ्यायला लावला. आता आम्ही खुंबू च्या माथ्यावर आलो. हि शेवटची क्रीवास ओलांडली कि आमचा कॅम्प १ (२०,००० फूट) चा एरिया. इथल्या शिड्या जाम मजेशीर होत्या, तीन स्टंपांवर बेल्स ठेवल्यासारख्या. दोन शिड्या ज्या हिमखंडावर रेस्ट झाल्या होत्या तो कधी पडेल हेफक्त रामालाच ठाऊक. राम राम म्हणत सगळे सुखरूप कॅम्प १ वर पोहोचलो. १०-१५ मिन. विश्रांती घेऊन कॅम्प २ च्या दिशेने चालायला लागलो. 

या एरियाला 'वेस्टर्न CWM' किंवा 'वेस्टर्न कुम' म्हणतात. घोड्याच्या नाळेसारखी ह्या भागाची रचना आहे. एका बाजूला 'एव्हरेस्ट' (२९,०३५ फूट), समोर 'लोहोत्से' (२७,९३२ फूट) शिखर, आणि उजव्याला बाजूला 'नुपत्से' (२५,६३६ फूट) शिखर. ह्या तीन Himalayan giants च्या मधून आम्ही चाललो होतो. 

प्रत्येकजण आपापल्या रिदममध्ये चालत होता. बर्फावरून चालताना होणारा कारामकुरुम आवाज, श्वासांचा आवाज आणि गुरांच्या गळ्यातल्या घंटेसारखा होणारा इक्विपमेंटचा आवाज या व्यअतिरिक्त पूर्ण आसमंतात कोणताही आवाज नव्हता. २७ एप्रिलला ऍव्हलाँच झाला होता. हिमालयाच रौद्र रूप आम्हाला अनुभवायला मिळालं होत. शंकरांच्या तांडवाच्या खुणा अजूनही वाटेववर होत्या. मोठ- मोठे आईस ब्लॉक वाटेवर पडले हते.

कॅम्प २ (२१,००० फूट) चे टेन्ट दिसायला लागले होते. चढायला सुरुवात केली तर एका शेर्पा मित्रानी मला मस्त गरमा गरम सरबत दिल. त्याला मी त्याच्या टीम चा मेंबर वाटलो, मला हि तो आमच्या टीम चा मेंबर वाटला. आमचा टेन्ट सगळ्यात वरती होता. जवळपास पर्वती एवढं चालून गेल्यावर आमच्या कॅम्पसाईट वर आलो. साधारण सव्वा दोन पर्यंत सगळे सुखरूप कॅम्प २ ला आले. जेवण करून सगळे आपापल्या टेन्ट मध्ये शिरलो. अनावश्यक हालचाल, बडबड इव्हन विचार पण टाळायचे होते. कारण एनर्जीचा एकनएक अंश वाचवायचा होता. शांत चित्तानि झोपी गेलो.

क्रमशः 

।। कृष्णार्पणमस्तु ।।


१७ मे २०१२

सकाळी लवकर उठुन डबा टाकायला बाहेर पडलो. एका निमुळत्या होत गेलेल्या क्रिव्हास च्या टोकावर टॉयलेट टेन्ट लावला होता. अंगात दोन-तीन कपड्यांचे लेअर घातले होते, त्यावर फेदर जॅकेट, हातात ग्लोव्ह्ज, पायात अवजड स्नो-शुज घालून, डुगडुगणाऱ्या फळकुटावर पाय ठेऊन बॅलन्स करत, दोन्ही हातांनी टेन्ट चा पोल घट्ट धरून, पार्श्वभाग क्रिव्हास मधे केला. इंडियन स्टाईल च्या संडासात वेस्टर्न स्टाईल सारखं बसावं लागत होत. बापरे, आयुष्यात डबा टाकायला सुद्धा येवढे कष्ट आणि एकाग्रता करावी  लागेल असं कधी वाटलपण नव्हतं. येवढे कष्ट आणि कॉन्सन्ट्रेशन जर अभ्यासात केले असते तर डॉक्टर किंवा इंजिनीर नक्की झालो असतो.

डायनिंग टेन्ट मधे वातावरण तंग होत. कॅम्प २ वर आल्यापासून भुषण हर्षे ला श्वसनाचा त्रास होत होता. बेसकॅम्पला डॉक्टरांशी संपर्क झाला. रात्रभर विश्रांती घेउनपण फारशी सुधारणा नव्हती. त्यानी समिट अटेंम्प्ट सोडायचा निर्णय घेतला. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सचिन डेंग ला उलटी मधून रक्त पडायला लागलं म्हणून त्याला आणि आता भुषण ला मोहीम सोडायला लागत होती. टीमसाठी हा धक्का आणि मोठा लॉस होता.

पण शिखरावर फक्त झेंडा फडकवण म्हणजे गिर्यारोहण थोडच आहे. आपल्या क्षमता ओळखणं म्हणजे गिर्यारोहण, योग्य वेळेला मनाचा आणि योग्य वेळेला बुद्धी चा कौल मानणे म्हणजे गिर्यारोहण, वेळ ओळखून माघार घेणे आणि योग्य वेळी दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतः चा जीव धोक्यात घालणे म्हणजे गिर्यारोहण, फायटिंग स्पिरिट म्हणजे गिर्यारोहण, दुसऱ्यांच्या यशात आपलं यश बघणे म्हणजे गिर्यारोहण. बारा जणांच्या टीम पैकी एक जण जरी शिखरावर पोचला असता तरी ते यश सगळ्या संघाचं झालं असत आणि ह्याची जाणीव निश्चितच सगळ्यांच्या मनात होती. पण भुषणच्या निर्णयानी प्रसाद जाम खचला. भुषण सकट सगळ्यांनी त्याची समजूत काढून त्याला बक-अप केलं. भुषण बेसकॅम्प ला निघाला आणि आम्ही कॅम्प ३ ला. 

डावी कडे सह्याद्री च्या बेलाग कड्या सारखा एव्हरेस्ट चा साऊथ-वेस्ट फेस दिसत होता. १९७५ साली Chris Bonington च्या नेतृत्वा खाली Dough Scott, Dougal Haston, Peter Boardman आणि Pertemba नि एव्हरेस्ट वर ह्या ‘साऊथ-वेस्ट मार्गे’ पहिल्यांदा यशस्वी आरोहण केलं. ह्याआधी ५ मोहिमांना अपयश आलं होत. हिमालयातला " Last big problem " सॉल्व्ह झाला होता. आपण ज्या गोष्टींशी, व्यक्तींशी कनेक्ट झालेलो असतो त्यांचं अस्तित्व आपल्या पदोपदी जाणवत असत. पुस्तकांमधे वाचलेली वर्णन, व्यक्तिरेखा मला साऊथ-वेस्ट फेस वर दिसायला लागल्या. अर्थात मनात. इथे ऑक्सिजन भरपूर असल्यामुळे अजून तरी भास व्हायला लागले नव्हते. पण त्यांनी अशी चढाई केली असेल का ? इथे टेन्ट लावले असतील का ? असे विचार सुरू झाले. 

कॅम्प २ बराच मागे पडला. मी पुढे चालत होतो. मला माझा स्पीड कमी असल्या सारखा वाटत होता. माझ्यामुळे बाकीच्यांचा स्पीड कमी पडायला नको म्हणून मी आनंद ला पुढे जायला सांगितलं. ' तु बरोबर स्पीड नि चालला आहेस, पुढेच चालत रहा ' इति आनंद. बऱ्याचवेळा आपल्या क्षमतांची जाण आपल्याला नसते. कोणीतरी जांबुवंत होऊन त्यांचं ज्ञान आपल्याला करून द्यायला हवं असत. असे जांबुवंत मला वेळोवेळी भेटले.  

आता लोहोत्से फेस च्या पायाशी आम्ही पोचलो. लोहोत्से फेस तुळतुळीत हिऱ्यासारखा चमकत होता. पहिल्यांदा आम्ही जेंव्हा कॅम्प ३ ला चाललो होतो तेंव्हा प्रचंड रॉकफॉल चा सामना करावा लागला होता. तेंव्हाच एक दगड भुषण च हेलमेट तोडून त्याच्या कपाळावर बसला होता. कारगिल युद्धात आपले सैनिक गोळ्यांच्या वर्षावाला छातीचा कोट करून कसे सामोरे गेले असतील ह्याची पुसटशी कल्पना आली.  

रॉकफॉल टाळण्यासाठी रूट खूप उजवी कडून काढला होता. त्यामुळे कॅम्प ३ वर पोचण्या साठी लागणारा वेळ १. ५ तासांनी वाढला होता. वातावरण बदलायला लागलं, व्हिजिबिलिटी खूप कमी झाली. दुपार पर्यंत सगळी टीम कॅम्प ३ ला पोचली. कॅम्प ३ चे टेन्ट लोहोत्से फेस च्या ७०° ते ८०° च्या उतारावर बर्फ कापून लावले आहेत. 


आधी आम्ही ज्या टेन्ट मधे राहिलो होतो ते टेन्ट आइस avalanche मुळे पूर्ण फाटून गेले होते. मी, टेकराज, चेतन आणि राहुल एका टेन्ट मधे होतो. आज आमची उंची २४,५०० फूट होती. पुढ्यात पसरलेली valley आणि समोर दिसणारा पुमोरी पहात नूडल्स खाल्ल्या. झोप कोणालाच लागली नाही. सगळे नुसते बसून होतो. उद्याचा दिवस कसा पाहिजे ह्याच चित्र मनोमन रेखाटत होतो.

क्रमशः 

।। कृष्णार्पणमस्तु ।।


१८ मे २०१२

कॅम्प ३ पासून (२४,५०० फुट) आम्ही सगळ्यांनी सप्लिमेंटरी ऑक्सिजन सिलेंडर लावला. या सिलेंडरच वजन २.५ ते  ३.५  किलो असत आणि त्यात ३ ते ४ लिटर ऑक्सिजन असतो जो १५ तास किंवा २ तास  पुरतो. रेग्युलेटरने त्याचा फ्लो जसा ऍडजस्ट करू तसा त्याचा पुरवठा होतो. फ्लो जास्त ठेवला तर ऑक्सिजन लवकर संपतो आणि कमी ठेवला तर जास्त वेळ पुरवठ्याला येतो. तात्या विंचूचा जीव जसा बाहुल्यात होता. तसा आमचा जीव सिलेंडरमध्ये बंदिस्त होता. सगळं इक्विपमेंट सॅक मध्ये भरून बाहेर पडायला उशीर झाला. बाहेर जाऊन बघतो तर सगळे गणपती लाईनीत लागले होते. आमचा मानाचा शेवटचा गणपती होता, दगडूशेठ आणि मंडई. मी आणि टेकराज एकमेंकाडे बघतच बसलो, आता काय करायचं ? कॅम्प ४ (२६,२४० फुट) वर २ ते २.३० च्या दरम्यान पोहोचणं गरजेचं होत. कारण समिटसाठी आजच रात्री ८ ला निघायचं होत. त्यासाठी विश्रांती गरजेची होती.  

अता आमच्या प्रत्येकाबरोबर एक शेर्पा मित्र होता. माझ्या बरोबर डींडी दाई आणि टेकराज बरोबर पेम्बा दाई होते (नेपाळीमध्ये  मोठ्या भावाला दाई म्हणतात). मेन रोप मधून आम्ही सेल्फ अँकर काढला. आणि फ्री क्लाइंबिंग करायचा प्रयत्न केला. पण कठीण बर्फ़ावरून फ्री क्लाइंबिंग करण अवघड जात होत. डींडी दाई आणि पेम्बा दाईनी आम्हाला एका आईस ब्लॉकच्या मागून काढलं. चढण तीव्र होती त्यामुळे ५० - ६० गिर्यारोहकांना आम्ही क्रॉस केलं. ७०°–८०° च्या तीव्र कोनातून चढाई होती. चालता चालता 'डाउन सूट' च्या हूड चा फ्लॅप मास्क मध्ये ज्या नोझल मधून बाहेर ची हवा आत येते त्या वर आला आणि ऑक्सिजन चा पुरवठा बंद झाला. सर्वशक्ती नि कोणीतरी नाक दाबून ठेवल्या सारखं झालं. डिंडि दाई च्या लक्षात आलं आणि त्यांनी फ्लॅप मास्क वरून काढला. काही सेकंदात ब्रम्हांड आठवलं. 

चालताना नजर वर गेली आणि एव्हरेस्टच शिखर दिसलं. त्याची उंची पाहून फाटली होती. काही गिर्यारोहक समिट करून खाली येत होते. अजून किती चढाई बाकी आहे याची पुसटशी कल्पना आली. अजून खूप उंच जायचं होत. 

काल टेन्टमध्ये चेतन म्हणत होता, " 'चक दे इंडिया' मध्ये त्या खेळाडूंसाठी ७० मिनिटांचा परफॉर्मन्स होता आणि आपल्याला पुढचे काही दिवस हाय परफॉर्मन्स द्यायचा आहे. त्यामुळे पेनकडे आजिबात लक्ष देऊ नका.'' खर तर १६ तारखेपासूनच तो सुरु झाला होता आणि किती दिवस सगळ्यांना त्या मोड मध्ये असावं लागणार होत हे अजून अज्ञात होत.

वरती असलेल्या गिर्यारोहकांच्या पायाने बर्फ़ाचे गोळे घरंगळत खाली येत होते. खाली येताना त्याचा आकार मोठा व्हायचा. गोटीच्या आकाराचे खाली येईपर्यंत चेंडुच्या आकाराचे व्हायचे. ते बघताना जाम मजा येत होती. वारा पण सुसाट सुटला होता. वाऱ्याच्या झोताबरोबर बर्फ़ाचे कण बाणासारखे चेहऱ्यावर आदळत होते. आमच्या पुढे गिर्यारोहकांची लाईन लागली होती. आहे त्याच पेसमध्ये चाललो तर समिट होण अवघड होत. मेन रोप मधून सेल्फ अँकर काढला आणि पिवळा दिवा लागल्यावर ज्या स्पीडमध्ये गाड्या जातात तस सगळ्यांना ओव्हर टेक करत निघालो. सगळे आमच्या कडे टकामका बघायला लागले. सगळ्यांवर एक पुणेरी कटाक्ष टाकला. गॉगल आणि मास्क असल्यामुळे आमचे एक्स्प्रेशन त्यांना कळले नाहीत. नाही तर बिचाऱ्यांना फार अपराधी वाटलं असत. 

मधे १ रॉक पॅच लागला. एव्हरेस्टवरचा तो पहिला रॉकपॅच दगड होता. हा सेडीमेंट्री प्रकाराचा पिवळ्या रंगाचा दगड आहे. यालाच 'येलो बँड' असं म्हणतात. इथे बर्फ रहात नाही. त्यामुळे क्रॅम्पॉन घालून त्यावर चालावायचं म्हणजे आईस बॅले करणाऱ्याच्या नजाकतीत चालावं लागत होत. रात्रभर नीट झोप नव्हती तरी उत्साही आणि फ्रेश वाटत होत. आता 'जिनीव्हा स्पर' दिसायला लागली. 

आता पर्यंत पुस्तकात वाचलेल्या जागा प्रत्यक्ष पहात होतो. हे फिलिंग फार भारी होत. 'जिनिव्हा स्पर' किंवा 'सॅडल रिब' साधारण २५,००० फुटांवर आहे. १९५२ साली 'स्विस मोहिमेत' याच जिनिव्हा स्पर असं नामकरण झालं. जिनिव्हा स्परचा उंबरा ओलांडून आम्ही 'साऊथ कोल'  म्हणजेच कॅम्प ४ (२६,२४० फूट) मध्ये प्रवेश केला. आता मी 'डेथझोन' मध्ये होतो. २ पर्यंत, म्हणजे अगदी परफेक्ट वेळेत कॅम्प वर पोहोचलो होतो. ८००० मीटर आणि त्याच्या वरच्या भागाला गिर्यारोहण क्षेत्रात डेथझोन हि संज्ञा आहे. 'साऊथ कोल' वर एक मोठा पाषाण दिसला. १९९२ साली डॉ. डी टी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिली नागरी मोहीम एव्हरेस्ट चढायला अली होती. ९२ च्या मोहिमेतील सदस्य मोहनभाई आणि मिलिंद पोटे सरांकडून त्या मोहिमेचे अनुभव ऐकायला मिळाले होते. त्या पाषाणा पाशी टेन्ट पासून काही अंतरावरच असताना वादळामुळे रेमंड जेकब आणि डॉ.डी.टी कुलकर्णी सरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांना मनोमन नमस्कार करून टेन्ट मधे आलो. 

साऊथ कोल हा लोहोत्से शिखर आणि एव्हरेस्ट शिखराच्या मध्ये वसलेला कॅम्प आहे. आता एव्हरेस्ट चा पिरॅमिड स्पष्ट दिसायला लागला. 

आम्ही  क्रॅम्पॉन बाहेर काढून स्नोशूज घालूनच टेन्टमध्ये बसलो होतो. ४ वाजत आले तरी प्रसाद अजून कॅम्प वर आला नव्हता. सगळेच गॅसवर होतो. आमचे शेर्पा सरदार कामी दाई प्रसादला शोधायला बाहेर पडणार तेढ्यात प्रसाद कॅम्प साईट वर आला. बेसकॅम्पवरून निघाल्यापासून त्याच पोट अखंड दुखत असल्याने त्याचा स्पीड कमी पडला होता. पण तो एकदम फिट दिसत होता. गरम पाणी पित टेन्ट मधेच रेस्ट घेत होतो. मी, प्रसाद, कृष्णा ८ वाजता तर बाकी सगळी टीम ९ वाजता 'समिट पूश' साठी निघणार होती. कल्पनेच्या बाहेर वारा जोराने वाहू लागला होता. मनात कोणतेही विचार नव्हते. ८ वाजण्याची प्रतीक्षा करत होतो.


क्रमशः 

।। कृष्णार्पणमस्तु ।।


१९ मे २०१२

साऊथ कोल वर भयंकर वार सुटलं, इतकं कि पाच फुटांवरच्या टेन्ट मधे सुद्धा communicate करता येत नव्हतं. मी, प्रसाद आणि कृष्णा ८ वाजता निघणार होतो. पण काहीच संपर्क करता येत नव्हता. मला निघेस पर्यंत ९ वाजले. थर्मास च्या झाकणात पाणी प्यायलो आणि चालायला  सुरवात केली. टेन्ट सोडून समिट च्या दिशेनी पाच पावलं पुढे गेलो, म दहा, म वीस. टेन्टची सुरक्षितता सोडून समिटच्या दिशेनी अज्ञाताचा प्रवास सुरु झाला. फांदीची सुरक्षितता न सोडता आकाशातली भरारी तरी कशी अनुभवणार. थोड सपाटीवर चालल्यावर चढण सुरु झाली. मोठ्ठ स्नो-फिल्ड होत, जवळजवळ दोन फुटबॉल ग्राउंड एवढं. इथे धोका नसल्यामुळे लाइन मधून न चालत सगळ्यांना मागे टाकत झपाझप चालत निघालो. कोण कुठे होत, कधी निघाले होते काहीच कळायला मार्ग नव्हता. कारण एकतर रात्र आणि दुसरं म्हणजे सगळेच लाल रंगाच्या डाउन सूट मध्ये, सगळेच एकमेकांचे जुळे भाऊ वाटत होते. श्वासांचं गाणं ऐकत ऐकत एक एक पाऊल टाकत होतो. आकाशात तारे चमकत होते आणि एव्हरेस्ट च्या अंगावर गिर्यारोहकांचे हेडटॉर्च लुकलुकत होते. मला आतून प्रचंड एनर्जी जाणवत होती. मस्त रिदम मिळाला होता. एकाठिकाणी जाऊन सगळं रिदम तुटला. अता चालायला ऐसपैस जागा नसल्यामुळे लाइनी मधूनच चालावं लागत होत. त्यामुळे एनर्जी असून सुद्धा हळूहळू चालावं लागत होत. जाम राग  आला, चिडचिड झाली. आरसा आपल्याला बाह्यरूप दाखवतो पण डोंगर गुरु सारखे आपलं अंतरंग आपल्यापुढे उलगडतात. माझी स्ट्रेंथ जशी मला दाखवली तस चिडचिड, राग हे विकार हेसुद्धा दाखवून दिले. त्यांनी शांत राहून चालत रहायला संगीतल. 

अता एकदम अरुन्दश्या जागेतून मार्ग होता. एकजण जरी स्लो झाला तरी सगळ्यांना स्लो चालायला लागत होत. पण दुसरा पर्याय नव्हता म्हणुन फार विचारकरण्यात अर्थ नव्हता. 

मी स्नो-शुज मध्ये एक नॉर्मल सॉक्स त्यावर एक हाय अल्टीट्युड वर वापरायचे सॉक्स घातले होते, स्नो-शुज मध्ये अजून एक शुज असतात. त्याला इंनर शुज म्हणतात. तर अंगात थर्मल इंनर, त्यावर दोन टीशर्ट आणि outer layer डाउन सूट चा होता. हातात दोन ग्लोव्हज वर मीटन घातले होते. येवढा कडेकोट वेढा फोडून थंडी हडांपर्यंत जात होती. चालण्याचा स्पीड कमी झाला होता, त्यात गार वाऱ्याचा मारा चालू होता. ब्लड सर्क्युलेशन कमी होऊन फ्रॉस्ट बाईट चा धोका होता. जिथे थांबायला लागत होत तिथे जागेवर लेफ्ट राइट करत टाळ्या वाजवत होतो जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन व्यस्थित चालू राहावं. जगभरातून बरेच गिर्यारोहक क्लाइम्ब करायला आले होते. कोणाच्या सॅक वर US चा झेंडा होता तर कोणाच्या छातीवर जर्मनी चा होता. आपल्या देशाच प्रतिनिधित्व करणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या पण ह्यावर्षी खूप होती. साधारण तीन वाजता Balcony (२७,५०० फूट) त पोचलो. तिथे पोचल्यावर कळलं मी, चेतन आणि आनंद मागेपुढेच होतो. इथे गिर्यारोहकांना उभ्याउभ्या थोडी रेस्ट घ्यायला थोडीफार जागा आहे, ह्या फिचर ला Balcony म्हणतात. 

इथे येईस पर्यंत सहा तास लागले. इथे नवीन सिलेंडर लाऊन पुढे चालायला सुरवात केली. अता एका शार्प ब्लेड सारख्या धारे वरून चालत होतो. एकावेळेला एकच पाऊल ठेवता येईल एवढीच जागा, उजवीकडे तोल गेला कि तिबेट मधे आणि डावीकडे तोल गेला कि डायरेक्ट कॅम्प २ वर, अशी गत होती. चढपण छातीवर होता. अता पाच पावलं चालून विस्कळीत झालेला श्वास एकत्र करायला थांबायला लागत होत. प्रत्येक पावलागणिक शरीर थकत होत पण मन त्याला शक्ती पुरवत होत. माझ्या ध्येया साठी आई बाबांनी त्यांचा आनंद, सुख, आराम, सुरक्षितता पणाला लावली होती. अज्जी नि पण मनावर दगड ठेवला होता. एकवेळ अशी होती कि मला माझ्यासाठी एव्हरेस्ट चढायचं होत पण अता मला आई बाबा आणि अज्जी साठी एव्हरेस्ट करायचं होत. लहानपणीचा आई बाबां बरोबरचा फोटो एव्हरेस्ट च्या माथ्यावर ठेवायचा हे एकच ध्येय शरीर आणि मनाला ऊर्जा देत होत. 

साऊथ समिट पासून थोडं खाली असताना सूर्य त्याची उबदार किरण घेऊन आला. हिमालयात सूर्य कायमच आनंद,उत्साह आणि विश्वास घेऊन येतो. उजवीकडे क्षितिजा पर्यंत तिबेट च पठार पसरलं होत. तर डावीकडे नेपाळचे अजस्त्र हिमाच्छादित डोंगर, वर्षानुवर्षं ध्यानाला बसून दाढीमिशा पांढऱ्या झालेल्या तपस्व्या सारखे दिसत होते. अता माझ्यापुढे रुपेश असल्याचं कळलं. माझ्या सॅक च्या टॉप पाउच मधला गॉगल त्यानी दिला. सूर्योदया मुळे अता गॉगल घालणं अनिवार्य होत नाहीतर १००% स्नो ब्लाइंडनेस झाला असता. 

मनात कोणतेच विचार नव्हते. ह्या क्षणाला काही हव किंवा नको असल्याची कोणतीच भावना नव्हती. शरीर पराकोटीचं थकलं होत. भीष्मराज बाम सरांच्या सेशन मधे ऐकलं होत. 'विसरून जा कि तुम्हाला एव्हरेस्ट करायचं आहे, त्या क्षणात राहा.' आणि खरोखरच मागचं प्रत्येक पाऊल पुढे टाकणं हेच माझ्यासाठी एव्हरेस्ट झालं होत. क्षणात जगणं ह्यालाच म्हणत असतील बहुदा. न यशाची चिंता न अपयशाची काळजी. साऊथ समिट आणि मेन समिट च्या मधल्या नॉच मध्ये आलो. समिट रिज ला खेटून चाललो होतो. डावीकडे साऊथवेस्ट फेस चा तीव्र उतार होता तर उजवी कडे कांगशुन्ग फेस पसरला होता. 'कांगशुन्ग फेस' एव्हरेस्ट चा 'हार्डेस्ट रूट'. Stephen Venables च "Everest: Kangshug Face" हे वाचलेलं पुस्तक आठवलं. एक रॉकी ट्रॅव्हर्स पार केली. अता माझ्या बरोबर कृष्णा होता. समोर प्रसिद्ध 'Hillary Step' (२८,८० फूट) दिसायला लागली. जगातल्या सर्वात उंची वरच रॉक क्लाइंबिंग करायला सुरवात केली. डावी कडे ८,५०० फुटांचा ड्रॉप तर उजवी कडे १०,००० ड्रॉप होता. 'Hillary Step' वर रोप च जंजाळ होत. एका रोप मधे 'जुमार' (गिर्यारोहणातील साधन) लावला पण सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून रहाणं योग्य नव्हतं. कारण रोप कसा anchor केला आहे ह्यची कल्पना नसते. काही मिनिटात हि ४० फुटी भिंत पार केली. अता माझ्यात आणि एव्हरेस्ट च्या माथ्या मधे २०० फुटांचं अंतर होत. इथून माथ्या पर्यंत सेफ्टी रोप नसल्यामुळे फार जपून चालत होतो. वाटेत मला प्रसाद, चेतन आणि टेकराज दिसले त्यांचं समिट झालं होत. समिट वरचे प्रेअर फ्लॅग. दिसायला लागले. एकएक पाऊल टाकता टाकता समिट कधी आलं कळलंच नाही. १०.१५ वाजता पृथ्वी च्या सर्वोच्च स्थानी उभा होतो. आई बाबां चा फोटो समिट वर ठेऊन फोटो काढला. जे स्वप्न उराशी बाळगलं होत ते पूर्ण झालं. 

नॉर्थ बाजुंनी काही गिर्यारोहक वर येत होते. डोक्यात घंटा वाजायला लागल्या. माझ्याकडचा तिरंगा काढून दुसऱ्या कोणाकडेतरी दिला होता. समोर बघतोतर रुपेश पण समिट वर पोचला होता. क्लाइंबिंग क्षेत्रात दोघांची सुरवात एकत्रच झाली होती. आणि आज एव्हरेस्ट च्या शिखरावर एकत्र पाऊल ठेवलं होत. खूप आनंद झाला. तिरंगा घेऊन अभिमानानी फोटो काढले. 

रुपेश च्या शेर्पा मित्रानी त्याला नवीन ऑक्सिजन सिलेंडर लावला. मी माझ्या डींडी दाई ला शोधात होतो तर हा भाई गायब. जाम फाटली होती. Balcony त लावलेला सिलेन्डर पुरणार का ? मोठ्ठा प्रश्न होता. अत्ता पर्यंत अर्धीच मोहीम झाली होती, जो पर्यंत सगळे सुखरूप बेस कॅम्प वर येत नाही तो पर्यंत ती पूर्ण होत नसते. समिट वर जाण हे ऑपशनल असत पण वर पोचल्यावर खाली उतरण हे मँडेटरी असत. १५ मिनटं समिट वर थांबून उतरायला सुरवात केली. Hillary Step पाशी bottle neck होते. एकावेळेला एकच climber खालीवर करू शकतो. खालून वर येणाऱ्या गिर्यारोहकाला प्रायोरिटी देऊन वर घ्यायला लागत. वर नुसतं उभं राहून पुतळा झाला. जवळजवळ तास भर तिथेच अडकलो होतो. ऑक्सिजन पण प्रत्येक श्वासा बरोबर कमीकमी होत चालला. आसावरी ताई नि करून घेतलेला दीर्घ श्वसनाचा अभ्यास तरून नेत होता. गॉगल च्या आत मधे फ्रॉस्ट जमा झालं त्यामुळे गॉगल मधून अंधुक दिसायला लागलं. तशीच उतरायला सुरवात केली. शरीर पार मोडायला आलं. अंधुक दिसण्या मूळे माझा स्पीड कमी झाला. आमचा कामी दाई जाम हाइपर झाला, काय होतंय त्या बिचाऱ्या ला कळलं नाही. गॉगल १००% fail झाला. स्नोब्लाइन्डनेस च्या भितीनी जामच फाटली. माझ्या कडे एक बॅकअप गॉगल होता पण कॅम्प ४ ला. कसाबसा स्नो फिल्ड च्या वर आलो. अता कंपॅरिटिव्हली धोका कमी झाला होता. सूर्या ची प्रखरता पण कमी झाली होती. कॅम्प ४ ला पोचायला संध्यकाळचे ६ वाजले. काल रात्री ९ ते आज संध्याकाळी ६ वाजेस पर्यंत घश्यात पाण्याचा थेम्ब हि नव्हता. टेन्ट मध्ये टेकराज आणि त्याचा पेम्बा दाई होते. गेल्या गेल्या टेकराज नि मला पाणी प्यायला दिल. पाणी पिउन शरीर कॅरीमॅट वर झोकून दिल. वारा टेन्ट ला झोडपत होता. आजची रात्र माझ्यासाठी तर सरव्हायवल ची रात्र होती. 


क्रमशः 

।। कृष्णार्पणमस्तु ।।


२० मे २०१२

सकाळी डोळे उघडले. श्वास चालू होते. म्हणजे जिवंत आहे. कालची रात्र सरव्हाइव्हल ची रात्र होती. २३,२४ तास ना अन्नाचा कण ना पाण्याचा घोट. टेन्टमध्ये आल्यावर टेकराजने कप भर पाणी दिलं, २४ तासानंतर पहिल्यांदा कपभर पाणी प्यायलो. पाणी देऊन टेकराज झोपला. त्याचा शेर्पा मित्र पेम्बा आधीच ढाराढूर झाला होता. घड्याळ पाहिलं तर १० वाजले होते. म्हणजे अजून ७,८ तास तगून रहायचं होत. सगळे व्यवस्थित कॅम्पवर आलेत की नाही कळायला काहीच मार्ग नव्हता. वारा सर्वशक्तीनिशी 'साऊथ कोल' वर तुटून पडला होता. मोठ्ठया धबधब्याच्या खाली बसल्या सारखं वाटत होत. समिट ला निघाल्या पासून सतत श्रीराम जयराम जय जय राम चा जप चालू होतं. ते नामच शक्ती पुरवत होतं आणि सगळ्यांना सुखरूप बेस कॅम्पला पण घेऊन जाणार होतं. विश्वास होता. 

आमचा टेन्ट बाळंतिणीच्या खोली सारखा झाला होता. सिलेंडरचा तर खच पडला होता. सगळे सिलेंडर अर्धेमुर्धे शिल्लक होते, एक संपला की दुसरा लाव, दुसरा संपला की तिसरा लाव, रात्र भर माझा हा खेळ चालला होता. दर पाच मिनिटांनी दोन घोट पाणी पित होतो. शरीराला Hydrate करायला पाहिजे होतं. पाणी पिऊन पिऊन एक नंबर चा कॉल आला. बेस कॅम्प वरून निघताना  'पी बॉटल' घेतली होती. तसही बाहेर जाऊन करणं शक्यच नव्हतं. पण 'पी बॉटल' सगळ्या टेन्टमध्ये कुठेच दिसत नव्हती. प्रेशर वाढत होत, टेन्टच्या बाहेर बघावं म्हणून टेन्टची चेन उघडली तर वाऱ्याबरोबर भसाभस बर्फ आत यायला लागला. चेनच्या फटीतून हात बाहेर काढला. दोनतीन वेळा चाचपडल्यावर 'पी बॉटल' हाताला लागली. जादूचा दिवा हाताला लागल्याचा आनंद झाला. हलकं झाल्या वर हुश्श झालं. कोणत्यातरी अध्यात्मिक पुस्तकात वाचलं होतं, खर सुख फक्त दोन गोष्टीतच आहे. निद्रा आणि शौच्य. आज ह्याची प्रचिती आली.

मोट्ठी रात्र संपून सकाळ झाली. बॅकअप चा गॉगल लाऊन बाहेर आलो. वारा त्याचा वेग कमी करायचा नाव घेत नव्हता. साऊथ कोल चा कॅम्प Windup करून 'जिनिव्हा स्पर' उतरायला सुरवात केली. Yellow Band वर थोडी रेस्ट घेऊन कॅम्प ३ वर आलो. दुसऱ्या एका ग्रुपच्या शेर्पा नी मला कोल्ड ड्रिंक दिलं. मोहिमेसाठी आम्ही सगळे वर्षभर तब्येती सांभाळून होतो. काठमांडू पासून तर गरम पाणीच पीत होतो. आता समिट झाल्यावर कसलं काय, म्हटलं हान तिच्यायला. वॉकीटॉकी खणाणला, मामा लाइन वर होता. मामानी विचारलं, आनंद आणि गणेश ला काय झालं, कसे आहेत ते?' काही झेपलच नाही. Balcony पर्यंत तर मी आणि आनंद बरोबर होतो. काय झालय काहीच कळत नव्हतं. सगळे विखुरलो होतो. माझ्या संभ्रमित आवाजातून माझी अवस्था मामाला कळली. 

'लोहोत्से फेस' उतरून 'वेस्टर्न CWM' मध्ये आलो. सूर्य आग ओकत होता. 'डाउन सूट' मुळे उकडलेल्या बटाट्या सारखी अवस्था झाली होती. सूर्य तापल्यामुळे बर्फ भुसभुशीत झाला होता, त्यामुळे चालणं जिकीरीचं झालं होतं.. काहीजण 'कॅम्प २' ला आले होते. 'कॅम्प २' वरच्या कूक नी सगळ्यांचं जेवण केलं. थोडं खाऊन डायनिंग टेन्ट मध्येच झोपलो. आनंद आणि गणेश च समिट ऑक्सिजन मास्क मध्ये आलेल्या प्रॉब्लेममुळे काही शे. फुटांनी राहिल्याचं समजलं. सगळेच खुप हळहळलो. गाभाऱ्यात जाऊन देवाचं मुखदर्शन न झाल्यासारखं होतं हे... पण दोघांनी खूप Positively घेतलं. आता सगळ्यांनाच बेस कॅम्पला जायची ओढ लागली होती. आता शेवटचं Obstacle, 'खुंम्भू आईसफॉल'. तो क्रॉस करताना नेहमीसारखंच खूप conscious राहावं लागणार होतं. Over exertion मुळे पडल्या पडल्या झोप लागली.

क्रमशः 

।। कृष्णार्पणमस्तु ।।












 










 



  























    





   


    



 


 


 

 

 

    





 


 


 

 

 

 


16 comments:

  1. Wow... Exciting stuff... वाचायला खूप मस्त वाटलं. आजचा दिवस, ८ वर्षांपूर्वी... must be amazing feeling for you Surendra

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर आणि थरारक अनुभव..!उद्याची वाट बघत आहे

    ReplyDelete
  3. खुपच सुंदर वर्णन आणि अनन्यसाधारण अनुभव, सुरेंद्र!

    ReplyDelete
  4. अत्यंत सुंदर वर्णन, डोळ्यासमोर उभं राहतं

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेखन आणि अनुभव

    ReplyDelete
  6. कोरोना एक इस्तापति वाटू लागलीय .एकाहून एक सरस लेख वाचायला मिळतायत .माळी जोरदार बॅटिंग करतायत आता आपणही .
    बर झालं आपण फार कॉन्सन्ट्रेशन ने अभ्यास वैगैरे नाही केलात नाहीतर आम्ही एका उमद्या गिर्यारोहकाला आणि त्यातल्या तेवढ्याच उमद्या लेखकाला मुकलो असतो .
    ते मानाचे गणपती भारी आवडलं
    अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रीतम सर. तुमची प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. आपलं लिखाण कोणालातरी आनंद देतंय ही भावना खूप समाधान देणारी आहे. धन्यवाद

      Delete
  7. खूप मस्त लिहिलंय। सर्व डोळ्यासमोर उभं राहतं होतं।

    ReplyDelete