हरिहर-बसगड

दोन galaxy एक मेकांना भिडल्यावर ब्रह्मांडात जशी उलथापालथ होत असेल तशी विचारांची उलथापालथ मनात चालली होती. लाव्हा रसाचे प्रवाह वहावे तसे संपूर्ण शरीरात रक्त वहात होत, धरणीकंप व्हावा तस डोळे, त्वचा, संपूर्ण शरीरच थरथरत होत. ढोलावर टिपरू पडून जसा आवाज घुमावा, तसा हृदयाच्या ठोक्यांचा आवाज काना पर्यंत उमटतत  होता. घर म्हंटल कि भांड्याला भांड लागतंच असं म्हणतात, पण आज आमचं घर म्हणजे भांड्यांचा कारखानाच झाला होता.
पण जस " सारी दुनिया एक तरफ और जोरू का भाई एक तरफ " तस काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर एक तरफ आणि डोंगरांचा मोह एक तरफ. म काय पाच विकारांना बोचक्यात गुंडाळून मोहाला बळी पडलो. २५ डिसेंबर ला रात्री १०. ३० ला अभिषेक बरोबर नाशका साठी प्रयाण केलं. हरिहर नि आम्हाला साद घातली होती. अभिषेक US वरून सुट्टी ला घरी आला होता. काका काकू ला प्रश्न पडला असणार हा घरी येतो कशाला ? आम्हाला तोंड दाखवायला कि डोंगरांना ?  कारण प्रत्येक सुट्टीत यायच्या आधी ह्याचे ट्रेक चे प्लॅन तय्यार असतात. मागच्या वेळेला भैरवगड झाला. आता हरिहर ठरवलं.


नाशिक रोड वरून निघालो. ह्याला highway का म्हणायचं हा प्रश्नच आहे. (आपला ८०ft रोड (शास्त्री) पण ह्या पेक्षा प्रशस्त आहे). प्रचंड ट्रॅफिक आणि हा थथाकथित highway. अप्पा बळवंत चौकातून गाडी चालवतोय असं वाटत होत. गाडीचं आणि आमचं पोट शांत होत, डोळे पण शांत होऊ नये म्हणून चहा च्या ब्रेक साठी थांबलो. चहा पिउन परत गाडी ला स्टार्टर मारला. आता इथून पुढचा रस्ता बाळसेदार झाला होता. रस्ता मोकळा होता. नजरेच्या टप्प्यात कोणतीच गाडी नव्हती. गाडी चांगली मौसम मध्ये आली. काही गाण्यांच्या ओळी काही क्षणांसाठीच लिहिल्या गेलेल्या असतात. मनाच्या FM वर गाण सुरु झालं. जाम आवडीचं. '' रात आई तो हम जैसे आवरा फिर निकले राहो मे और खो गए '' क्या बात है. पण google बाई नि आम्हाला पथभ्रष्ट होऊ दिल नाही.  Highway सोडून आतल्या रस्त्या ला लागलो. आमावस्से चा मिट्ट काळोख डोळ्यात साठवायला थांबलो. ओशो च्या ओळी आठवल्या. प्रकाश निर्माण केला जाऊ शकतो पण अंधार, तो शाश्वत असतो. अंधारानी जमीन आणि आकाशाला एकरूप केलं. त्या विराट काळोखाच्या घुमटात असंख्य तारे आपलं इटुकलं पिटुकलं अस्तित्व चमचम करून दाखवत होते.


५. १५ ला ओंकार ओक नि सांगितलेल्या निरगुडेंच्या च्या घरी दाखल झालो. ६ चा गजर लावून sleeping bag च्या उबेत शिरलो. मी जरी ६ चा गजर लावला असला, तरी शरीरातल्या body clock नि ६. ३० ला alarm set केला होता. म्हणून ६ च्या गजराकडे कानांनी डोळेझाक केली. ६. ३० ला लक्ख जाग आली. बाहेर चार टाळकी शेकोटीच्या उबेत थंडी घालवत बसली होती, त्यांच्यात सामील होस पर्यंत आमचे दिशादर्शक धुळाजी काका पण आले.


समोर डोंगरांची पुसटशी रेषा दिसायला लागली, हि सूर्योदयाची चाहुल होती. फटाफट चहा, पोहे खाऊन बाहेर पडलो तर आभाळात सुर्यदेवाला प्रसन्न वाटावं म्हणून त्याच्या रस्तावर किरणांनी रांगोळी काढायला सुरवात केली. समोर हरिहर ची अजस्त्र आणि मोहात पाडणारी कातळभिंत दिसत होती. सरळ हरिहर वर न जात वाट वाकडी करत आम्ही भास्करगड (बसगड) च्या दिशेनी निघालो. निघेस पर्यंत ७ वाजले होते. पक्षांची भूपाळी गाऊन झाली होती. कैक घरांची अंगण मात्र अजून झाडांच्या पांघरुणाखाली निजली होती. tar रोड सोडून जंगलात शिरलो. बसगडावर फारस कोणी जात नसल्या मुळे वाट फारशी मळलेली नाहीये. आणि धुळाजी काका बरोबर असल्यामुळे वाटेवर नजर ठेवायची गरज पण नव्हती. जसजसे चढणी ला लागलो तसतसे मनात ले विचार निवळायला लागले. मन आपसूकच श्वासांवर केंद्रित झालं. आता पक्षांच्या गाण्यात, श्वास आणि हृदयाच्या ठोक्यांनी पण ठेका धरला. अजून आकाशात सूर्यग्रहणाचा खेळ सुरु व्हायचा होता. डोंगराच्या पोटातल्या नैसर्गिक गुहेत बसलो. कोणी कोणाशी बोलत नव्हतं, बोलायची इच्छा पण नव्हती. समोरच दृश्यच असं होत. दोन डोंगरांच्या बेचक्यात जंगल पसरलं होत. क्षीण झालेली नदी वन्यजीवांची तृष्णा शमवायला डबक्यात साचली होती. वाऱ्याची नुसती पळापळ चालली होती, घामेजलेल्या शरीरावर काट्यासारखं ते बोचत होत. दूरपर्यंत डोंगरदऱ्यांची रेलचेल होती. दऱ्यांमध्ये धुक्याचीचादर पसरली होती. सूर्य आई होऊन साखर झोपेत असलेल्या धरती ला उठवायला आला होता, पण धुक्या नि आज्जी च्या मऊ नऊवारी पात्तळा सारखं तिला गुरफटून ठेवलं होत. काही क्षण असे असतात कि जेंव्हा वेळ थांबतो. आणि त्या क्षणात आपण खरे प्रवाही होतो. 


कातळात खोदलेल्या गोमट्या पायऱ्यांनी भक्कम दरवाज्यातून गडात प्रवेश केला. उंच टेकडी वर आभाळाच्या मंडपा खाली बसलेल्या मारुती च दर्शन घेतलं. कोण्या सेवाभावी संस्थेनी तिथल्या टाक्या आणि जमिनीत पुरला गेलेला दरवाजा श्रमदानातून बाहेर काढला आहे. 


माथ्यावरून वैतरणा जलाशय, उतवड चा डोंगर, हरिहर किल्ला, फणी चा सुळका, त्रिनगलवाडी आणि दूर क्षितिजावर गुजराथ दिसायला लागला. शांतता कानात भरून घेत, बुड उचलून गड उतरायला लागलो. उतार संपता संपत नव्हता. खिंडी पर्यंत उतरलो, कच्चा रस्ता ओलांडून फणी च्या डोंगरावर चढाई ला सुरवात केली. हरिहर ते बसगड वारी म्हणजे फणी च्या डोंगरा ला अर्धी प्रदक्षिणाच आहे. एक डोंगर वेगवेगळ्या बाजूनी बघण्यात मजा आहे. दोन्ही गड पाहून वेळेत निरगुडपाड्यात पोचायचं होत. आम्ही पायाला scating लावल्यागत वाऱ्यावर पळतहोतो. फणी च्या सुळक्याच्या सावलीतून बाहेर पडलो आणि परत हरीहर च दर्शन झालं. घड्याळ १०. ३० वेळ दाखवत होत. हरिहर च्या पायऱ्यांच्या मोहापाई पळतच सुटलो. 


११ ला त्याच्या पायाशी दाखल झालो. नवरीच्या हातावरची मेहेंदी जितकी रेखीव तितक्याच हरिहर च्या पायऱ्या, त्याच्या पोटातून खोदलेला रस्ता रेखीव. गडावर नेणारी हि घाटासारखी वाट कधी संपुच नये असं वाटत होत. वरच्या टाक्या पाशी बसवलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार केला. धुळाजीं नि दिवा लावला, आणि तडक छोटा rock patch चढून हरिहर च्या माथ्या वर पोचलो. गडाच्या टोकावर असलेली कोठी बघून गड उतरायला लागलो.


पाण्याचा शेवटचा घोट आणि बिस्कीट संपलं आणि पावलं झपाझप पडायला लागली. १ च्या ठोक्या ला मामांच्या घरी दाखल झालो. मस्त कोंबडी वर आडवा हात मारून १/२ तास वामकुक्षी घेतली. फ्रेश होऊन गाडीला स्टार्टर मारला आणि पुण्या कडे निघालो. 


हरिहर मागे पडला, डावी कडे नजर गेली आणि आपसूकच ब्रेक मारला गेला. उतरून त्या कातळकड्यांचं वैभव पहात होतो. पाडगावकर, गो. नि. दां सारखी प्रतिभा नाही म्हणून मनातल्या भावना शब्दांचं रूप घेत नव्हत्या. मी त्यांच्या प्रति असलेलं प्रेम डोळ्यांवाटेच व्यक्त केलं, त्यांनी पण प्रतिसाद देत मनाला तिथेच ठेऊन घेतलं आणि शरीराला पुण्यात पाठवलं.

|| कृष्णार्पणमस्तु ||






4 comments: