पकी मामानी ट्रेक चा बॅटन आमच्या पिढीकडे सोपवला. आपण सगळे अस करू तस करू, अस जाऊ तस जाऊ वरून मी एकटाच ट्रेक ला सुटलो. अमराईतून पुण्या मुंबईतुन आलेल्या सगळ्या भिडूंना एकत्र करून मिनीडोअर नी डॉट वेळेत वैजनाथ ला पोचलो. गेल्यागेल्या विनीत दादा कडे सॅक ठेऊन पहिला घराकडे वळलो. आधी जुन्या, रया गेलेल्या घराकडे पहावायच नाही. पण आता मोडकळीस आलेल घर, उतरवून जागा साफसूफ केली होती. आता जुन्या ज्योत्यावर नवी वास्तू उभी रहाणार. कसल भारी. एक आजोबा परसातला सगळा झाडोरा साफसूफ करत होते. मी झाडाला टेकून उभाहोतो, तर वाऱ्याची एक झुळूक आली. त्याचा स्पर्श खूप सुखाऊन गेला. अर्थाअर्थी माझा आणि गावाचा तसा काही संबंध नाही. पण काही ठिकाणांचा आणि आपला ऋणानुबंध असतो. कधी या जन्माचा नाहीतर मागच्या कोणत्यातरी, पण तो असतोसच. लहानपण वाडा संस्कृतीत गेल्यामुळे असेल किंवा आईच गाव म्हणून असेल पण वैजनाथ च मनात खास अस स्थान आहे. कदाचित याच मुळे त्या वाऱ्याच्या स्पर्शाने सुखावलो असेन.
उरलेल्या सामानाची जमवाजमव करून सगळे टेम्पो ची वाट बघत बसले होते. अजित दादा दर १/२ तासांनी टेम्पो १० मिनिटांत येणार असल्याचा वायदा करत होता. ९ चे १०, १० चे ११ वाजले तरी टेम्पो चा पत्ता नव्हता. सगळ्यांची अवस्था विठोबा साठी व्याकुळ झालेल्या तुक्या सारखी झाली होती. लग्नाळू couples जसे बोहल्यावर चढतात तसे tempo आल्यावर आम्ही त्यात उड्याच टाकल्या. आम्हाला धुळीनी माखवत टेम्पो 'मांडवण्यात' चालला होता. पाण्याविना व्हाईट वॉटर राफ्टिंग चा अनुभव कोणाला घ्यायचा असेल तर गाव खेडयात टेम्पो किंवा बैलगाडीची सफर करायलाच हवी.
' वैजनाथ महाराज कि जय ' आरोळी देऊन आम्ही चालायला सुरवात केली. चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या कोणत्यातरी देवाला नमस्कार करून, चौकातून राइट मारला. गवताळ पट्टा क्रॉस करून डाव्या अंगाच्या झाडीत शिरलो. सुरवातीलाच छातीवर येणारा चढ लागला. कोकणातल्या डोंगरांचा बाजच काही और आहे. सगळेच आभाळाच्या छताला भिडलेले, उंच आणि धिप्पाड. चढण्यात होणार त्रास पक्षांच्या गाण्यांनी सुसह्य झाला होता. तुम्ही इतरांपुढे स्वतः ला कितीही चांगल प्रेझेन्ट करा पण डोंगर तुम्हाला तुमचा खरा चेहरा दाखवणारच. म्हणूनतर स्वतःला ओळखण्यासाठी डोंगरभ्रमंती सारख दुसर साधन नाही.
श्वास, चाल आणि हृदयाचे ठोके ह्यांची अधेमधे लय तुटत होती. बडबडगीत संपुन श्वासांच सोलो गाणं सुरु झाल. इस मैफिल मे गानेवाले भी हम और सुननेवाले भी हम.
मधला कातळटप्पा चढून सगळे डोंगराच्या डोक्यावर आलो. वरती कोणत्यातरी company चे आधुनिक कामगार (JCB) डोंगर फोडण्याचं काम करत होते. त्या आसमंतात फक्त त्याचाच अप्रिय आवाज येत होता, बाकी सगळं गोमट होत. JCB ला बगल देत परत झाडीत शिरलो. विनीत दादाच्या guidance खाली अपर्णा वाहिनीनी केलेल्या भाजीभाकरी वर सगळे तुटून पडले. धनश्री वाहिनीनी केलेल्या चटणी नी यावर बहार आणली. तिचा अंदाज साफ चुकला, चटणी कमी पडली. पण कितीही आणली असती तरी कमीच पडली असती, इतकी ती भारी झाली होती.
जेवणा आधी आम्ही तिघ चौघ जण रत्नाकर काकां बरोबर जाऊन मुक्कामाच ठिकाण पाहून आलो कारण जेवणानंतर ते कल्टी मारणार होते.
जेवणानंतर शांत झालेल्या पण आकंठ भरलेल्या पोटानी आम्ही मुक्कामाच्या जागी निघालो. इथून रान अधिकच गच्च झालं होत. फारसा वावर नसल्यामुळे पायवाटा अधेमधे पुसट झाल्या होत्या. उरल्यासुरल्या पानगळिनी झाकून टाकल्या होत्या. वाळलेल्या पानांतून चालताना होणार कराम कुरुम आवाज, पक्षांचं पार्श्व गायन, तिथे नांदणारी शांतता क्षणभर का होईना भूत आणि भविष्य विसरायला लावून आम्हाला present देत होती. पाण्याच्या प्रवाहाने झालेल्या पायऱ्यांनी उतरून camp site वर आलो. जेवणा-खावणा साठी आणि शेकोटी साठी कोणी फाटी आणायला गेल, कोणी camp site साफसूफ करायला घेतली तर अनु मावशी, योगिनी ताई, मृणाल काकू आणि वरदा नि स्वयपाकघराचा ताबा घेतला. ह्यांच्या वर अन्नपूर्णा खरोखरच प्रसन्न आहे आणि कायमच राहील. कारण आल्यापासून जाईस पर्यंत ह्यांचा मुक्काम स्वयपाकघरातच होता. कितीतरीदा चहा आणि कॉफी चे पण लाड ह्यांनी पुरवले. ज्या energy नि वरदा सगळ्या कामात active participate करत होती. कमाल. एक चांगला trekker घडतोय. ह्याच १०० % तिच्या आई बाबांना.
कित्येक सूर्यास्त डोंगरात अनुभवले आहेत, पण प्रत्येक वेळेला 'तो' मोहिनी घालतोच. रात्रीच आभाळ लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवर सोपवून तो डोंगराआड झाला. रामरक्षा आणि मारुती स्तोत्र म्हणून बाप्पा कडे आमचं लक्ष असल्याची आठवण त्यांना करून दिली. Typical trek menu, भात आणि फर्मास रस्सा चेम्बवुन सगळे शेकोटीपाशी जमा झालो. भेंड्यांचा फड रंगला. रात्र सरत आली पण गाण्यांचा stock काही सरेना. दुसऱ्या दिवशी नाष्ट्याला Golden rice अर्थात फोडणीचा भात आणि जुगाड करून केलेले पोहे खाल्ले, केवळ अप्रतिम . धनश्री वाहिनीला birthday wish केल. डोंगरात वाढदिवस साजरा होण्यासाठी काहीतरी पुण्य असाव लागत.
माहेरवाशिणी चा जसा माहेरहून पाय निघत नाही तसा डोंगरांतून पाय निघत नव्हता. पण अधूनमधून मिळणाऱ्या सुखातच तर खरी मज्जा आहे. नाहीतर त्याची सुद्धा 'अति परिचयात अवज्ञा' होते.
।। कृष्णार्पणमस्तु ।।
No comments:
Post a Comment