आमची एस.टी पंगचर झाली, बदली ची एस.टी आली पण चार पाच किलोमीटर चालून ती पण पंगचर झाली. नशीब आज आमच्या कडे पाठ करून बसलं होत. वेळ कापरा सारखा उडत चालला होता. म चंद्रगड-आर्थरसीट चा प्लॅन रद्द करून रायगडा च्या वाटेला लागलो. Lions den बिरुद मिरवणारा आणि तोरणा, राजगड, लिंगाणा, मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, कोकणदिवा अश्या भक्कम किल्यांच्या कोंदणात जडवलेला दुर्ग दुर्गेश्वर रायगड टिपूर चांदण्यात अनुभवण्याचं भाग्य मिळालं. बाप्पा नि चंद्रगडा च दान राखून ठेवत रायगडा च दान आमच्या पदरात टाकलं. जे मिळालं त्यात पण आनंदच होता.
बऱ्याच वर्षांनी परत चंद्रगड-आर्थरसीट ची टूम निघाली. मी, चेतन आणि टेकराज ढवळे गावाच्या वाटेला लागलो. नशिबानी ह्यावेळेस सुखरूप ढवळ्यात पोचवलं. एका घरात सॅक ठेऊन चंद्रगडा कडे निघालो. हा सगळाच परिसर ट्रेकर जमातीला मोहिनी घालणारा आहे. बंबाळ रान, मनुष्य प्राण्या पेक्षा जंगली प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा असलेला वावर, उंच उंच डोंगर आणि त्यांच्या कुशीत नांदणारी शांतता. भटक्यां साठी ह्यापेक्षा मोहक अजुन काय असु शकत ? दुपारी जरा उशिराच आम्ही गावात पोचलो. सॅक तिथेच टाकून सडेच गडा कडे सुटलो. माकडांनी कालवा करून जंगल जाग केल आणि सगळ्यांना आम्ही जंगलात शिरल्याची वर्दी दिली.
जंगलाची वाट संपली आणि आम्ही गडाच्या चढणी ला लागलो. येवढा हा चढ तिव्र आहे की आम्हाला वाघासारख चारीही पॉईंट्स च्या मदतीनी वरवर सरकाव लागत होत. गड एकदमच छोटेखानी आहे. अगदीच एका हाकेच्या अंतरा एवढा. सुपारी एवढा भात, एका हाकेच अंतर, पुरुषभर उंची हि माप कोणत्याच शाळेतल्या पुस्तकात नाही सापडायची, कान उघडे ठेऊन गप्पा ऐकल्या कि भाषा आपोआप समृद्ध होत जाते.
माझी, मित्रा कडुन घेतलेल्या अँटिक अश्या Nikon FM10 रोल कॅमेऱ्या वर खटपट चालली होती. आता डिजिटल कॅमेरे आणि स्मार्टफोन मुळे सगळेच प्रोफेशनल फोटोग्राफर झालेत (ऑटो मोड मुळे असेल कदाचित). पण ह्याच मुळे R and D करण खुप सोईच झालय. नाहीतर आधी फोटो काढा, डायरीत त्याचा नंबर, त्याच aperture आणि shutter speed लिहा, नंतर फोटो धुऊन ते सगळ गणित tally करा. ह्या सगळ्या प्रकरणात खिश्याला चांगलच Debit पडायच.
चेतन नि आरोळी देऊन आसमंत दुमदुमून सोडला. आता आमची अंधारा बरोबर रेस लागली होती. तो आधी गावात पोचतोय का आम्ही. अंधारायच्या आत गावात पोचलो. एका शेतातच चूल मांडली. सूर्यास्ता नंतर मागे रेंगाळणाऱ्या प्रकाशावर अंधारानी पांघरूण घातलं. बॅटरी च्या प्रकाशात आमचा स्वयपाक चालू झाला. पिठलं भातानी क्षुधा शांत झाली. स्वयंपाका नंतरची झाकपाक करून, शेतातच कॅरीमॅट टाकून तुटपुंज्या शालीच्या उबेत शिरलो. तेंव्हा स्लीपिंग बॅग ची ऐष परवडणारी नव्हती. पारिजातानी मुक्तमनानी अंगणात प्राजक्ताचा सडा घालावा तस बाप्पानी आकाशात ग्रह, नक्षत्र आणि ताऱ्यांचा सडा घातला होता. दिवसा जंगलाच सौंदर्य पाहून आणि रात्री आकाशातलं सौंदर्य पहात पापण्या कधी टेकल्या आणि आमचं शवासन सुरु झालं, कळलंच नाही.
सकाळी चंद्रगडाला वळसा मारून ढवळ्या घाटाच्या वाटेला लागलो. एक नितांत सुंदर रंगीबेरंगी धनेश पक्षी उडत जात होता, बॅग्राऊंड ला आकाशावेरी गेलेला चंद्रगड. निव्वळ अप्रतिम. तो धनेश नक्कीच नर असणार. कारण मनुष्यजगतात सोडुन बाकी प्राणीजगतात मादी पेक्षा नरच आकर्षक असतोना. चालण्यात २.३ मिनिटांचा जरी फरक पडला तरी सोमोर चा दिसेनासा होत होता, इतकं जंगल किर्रर्र होत. छाती वरचा चढ सुरु झाला, ऐन थंडीत घामानी निथळत होतो, श्वास मोठ्ठा झाला, पार बेंबी पर्यंत उतरत होता, कानशिलं लाल झाली होती आणि वाटेवर वाघराला पंजा दिसला. एकदम सुस्पष्ट. आम्हाला जायचं होत त्याच दिशेला जाणारा. अंगावर काटा आला आणि डोक्याला झिणझिण्या. भीती, आनंद, टेंशन, उत्सुकता अश्या संमिश्र भावनांची मनात मंडई झाली. बिबट्या सारखं उमदं जनावर दुसरं नसेल. बऱ्याच जन्माचं पुण्य जमा झालं कि बिबट्या च्या योनीत जन्म मिळत असेल. सावध पणे चाललो होतो पण काही उपयोग नाही झाला. दिसलाच नाही, पण त्यानी आम्हला १००% पाहिलं असणार.
घुमटी पाशी आलो. टाक्या पाशी स्वयंपाक करून एक power nap घेतली आणि आर्थरसीट ला निघालो. मढी महाला पाशी असलेले पर्यटक विस्मयानी आमच्या कडे बघत होते. गजबजाटात जाण्या आधी सगळा सभोवार पहिला, google map open केल्या सारखा दिसायला लागला. एका अंगाला चंद्रगड आणि दुसऱ्या अंगाला मंगळगड, समोर प्रतापशाली प्रतापगड आणि त्याच्या पुढ्यातली अस्वलाच्या केसांसारखी दाट जावळी. पाठीशी, हिमालयातल्या शंकराला डोक्यावर घेऊन बसलेल महाबळेश्वर च पठार. शंकराची पण काय मज्जा आहे राव. दोन्ही घर त्याचीच. सह्याद्री पण आणि हिमालय पण.
फक्त आणि फक्त प्रपंच मागे आहे म्हणुन घरी परतलो.
।। श्रिकृष्णार्पणमस्तु ।।
No comments:
Post a Comment