Saturday, 4 June 2022

Himalayan diary 27th Dec 2021

जंगलाला बर्फानी आपली श्वेत साडी नेसवलेली दिसली आणि पावलं विलंबत मधून द्रुत गतीत पडायला लागली. पळतपळतच गेलो. झाडांच्या कॅनोपी तुन बाहेर आलो. समोर बर्फ डोंगर उतारावर आणि पायवाटेवर आमची वाट बघत पसरला होता. मानवी स्वभावाप्रमाणे दूरच्या गोष्टींचं आकर्षण तस हिमालयातल्या लोकांना समुद्राचं आकर्षण आणि आपल्याला बर्फाचं. 


आपल्या सह्याद्री मधे प्रत्येक ऋतूत धरणीच रूप बदलत. पावसाळ्यात अखंड वाहणाऱ्या प्रपात आणि जलधारांमुळे ती भासते हिरव्या काठाचा शालू नेसलेल्या नव परिणिते सारखी. हिरवाई संपते आणि ती नेसते पिवळी जर्द साडी, जणू धगधगत्या सूर्यानी त्याच्या किरणांनी विणलेलं वस्त्रच तिला भेट दिलय. प्रत्येक ऋतूत तिचा साज वेगळा, बाज वेगळा . 

आणि हिमालय, सर्वात तरुण डोंगर रांग. तो भासतो ज्ञानेश्वरां सारखा. तारुण्याचा उंबरठा ओलांडण्याच्या आधीच संसाराचा उंबरा ओलांडून परमार्थात ध्रुवपद मिळवलेल्या योग्या सारखा. परम पवित्र, शांत, समाधिस्त. दोघांमधे किती साम्य. सह्याद्री कडून वीरश्री घ्यावी आणि हिमालयाकडून सुंदरता, सात्विकता. तिथल्या वातावरणातली शांतता कानांनी ऐकावी आणि हृदयात भरून घ्यावी, बकुळेच्या फुलांनी ओंजळ भरावी तशी. ओंजळ रीती केल्यावरही जशी ती सुगंधानी भरून जाते तस हृदय त्या शांततेनी भरून ठेवावं, मनात उठणाऱ्या वादळशी सामना करण्यासाठी.  त्याच सौंदर्य बघता बघता त्याचाच भाग बनून जाव.   

आता जंगलाच्या उबेतून स्वतःला बर्फाच्या गारव्याला स्वाधीन केलं. प्रत्येकवेळा प्रेमाचा स्पर्श उबदार थोडाच असतो. बर्फात गेलं कि तो थंडगार असतो. म काय, नाक गोठलं, बोट बधिर झाली, spinal cord tight झाली. त्यानी प्रेमात पार गोठवून टाकलं. पहिल्यावहिल्या बर्फात सगळ्यांचे थोडे फोटो काढले आणि पहिल्या कॅम्प वर पोचलो. भोंडल्या भोवती फेर धरल्या सारखे सगळे टेन्ट बेकलताल च्या शेजारी एका तलावा भोवती गोल करून बसले होते. 

मुंगीला सुद्धा तिथे adjust करायला अवघड गेलं असत अशी टेन्ट ची गर्दी झाली होती, म आम्ही आमची कॅम्प साईट डावी कडे जंगलात सेट केली. दोन झाडांच्या मधे जिथे जागा मिळाली तिथे टेन्ट लावले. झाडांच्या गर्दीमुळे वारा काहीसा सुसह्य झाला. हिमालयातल्या झाडांचा बाजच वेगळा. पर्वतांच्या उंचीशी स्पर्धा करता करता ती पण उंच झाली असावी. आजची हिमालयातली पहिली रात्र. आता तीन रात्रीं साठी आमची घर बदलली होती. २ BHK, ३ BHK वरून Two man tent,  Three man tent, Four man tent अशी झाली. मास्टर बेडरूम आणि हॉल एका 6 * 5 च्या टेंट मधे सामावले होते. टेन्ट मधे सॅक टाकून, फ्रेश होऊन बाहेर आलो तस वातावरण बदल्ल. बर्फाचे छोटेछोटे दाणे पडायला लागले, तापमान झर्रकन खाली आलं. उच्छवासातुन वाफा यायला लागल्या. आता सगळे जुन्या बॉलीवूड सिनेमातले सिगार आणि पाईप ओढणाऱ्या जगदीश आणि प्राण च्या character मधे गेले. हातात सिगार काय पण कधी बिडी पण न धरलेले तोंडातून भका भका धूर काढायला लागले. नुसता TP. रिमझिम snowfall मधे जेवण केलं. नंतर लगेचच वरच्या टेकडीवर सगळे चालायला निघालो. Acclimatization चा नियम climb high and sleep at low. टेकडीवर जाऊन थंडीत मस्त कुडकुडत एक रोप ऍक्टिव्हिटी केली. दुपारचं जेवण जिरायच्या आत भटारखान्यात रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु झाली. वातावरण कुंद होत, आभाळ पण भरून आलं होत. शेकोटी भोवती सगळे बसून मस्त आलं लसूण पेस्ट चा तडका मारलेलं गरमागरम सूप पित बसलो. त्या थंड वातावरणात अस सूप म्हणजे पावसात भजी खाल्ल्या सारखं सुख होत ते. 

मेस टेंट मधे जेवण करून सगके आपापल्या टेंट मधे पांगले. सगळे गाण्यांचे दर्दी लोक मुडात आले. ज्योती, डॉक्टर, श्रुतिका, मैथिली, प्रीति आणि माया सगळ्यांनीच मैफील जमवली आणि मधुरा नि तर त्यात बहार आणली. गाणी कधीच संपू नये असं वाटत होत. पण आजच्या hike नि थकले भागले जीव टेंट मधे परतले. 

गार वारा सुटला. हिमालयातली थंडी हाडात जायला लागली, बत्तीशी वाजायला लागली. आमचे पोर्टर्स आणि guide ह्या ढगाळ वातावरणामुळे चिंतेत होते. त्यांच्या मते रात्री heavy snow fall होण्याची शक्यता आहे आणि तस झालं तर उद्या ची movement त्रासदायक होईल. शेकोटी जवळ मी, डॉक्टर आणि प्रताप बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो होतो. रात्र जशी चढत होती तशी गप्पाची रंगत पण चढत होती. आम्ही हलेना म्हणून शेकोटीनी तिची ऊब आवरती घेतली म आम्ही पण कुडकुडत टेंट मधे शिरलो.

कधी आली, कुठून आली, कशी आली कळलं नाही पण साधारण 2 का 3 ला टक्क जाग आली. टेंट च्या बाहेर आलो तर वातावरण क्लिअर झालं होतं, आकाश लक्ष चांदण्यांनी गच्च भरलं होत, टीपूर चांदण देवदार च्या झाडीतून खाली घरंगळत येत होतं, त्यानी मस्त जमिनीवर रांगोळी रेखाटली होती. चांदण्यात चक्कर मारायला बाहेर पडलो. चंद्रप्रकाशाच्या परिसस्पर्शा नी बर्फाचा शुभ्र रंग अधिकच खुलला होता. हिमालयातला थंडगार वारा सुटला होता, थंडीमुळे सभोवार पाय पोटाशी घेऊन झोपला होता, देवदार ध्यानस्थ बसले होते, निरव शांतता होती.  आकाशाच्या घुमटात ग्रहतारे दाटीवाटीनी बसले होते, त्यामधून एक तारा पडला. जे हवय त्याच्याच विचारांनी मनात गर्दी करून ठेवली, हा हा म्हणता दोन तीन तारे पडले. त्यानी दिलेल्या दानानी झोळी जड झाली. भविष्यात पुर्ण होणाऱ्या इछ्यानच्या assurity मुळे मन सुखावल. 

आसमंतात विचारांचे तरंग नव्हते आणि आता मनातही, कारण मनाचा ताबा चंद्रानी घेतला. मनाचा स्वामी आहे ना तो. पृथ्वीचा हा भाग ह्या वेळी अवीट सौन्दर्यानी नटला होता. सगळी सृष्टी स्वप्न जगात निद्रिस्त होती आणि मी स्वप्नवत जगत होतो. कृष्णमेघ कुंटेनच्या पुस्तकातलं वाक्य आठवलं '' काही मोजके क्षण काय ते आयुष्य असत, बाकी आयुष्य म्हणजे नुसता भारा असतो ". वाचलेलं अनुभवत होतो, त्या अवीट गोड आणि पवित्र सौन्दर्यानी भारलेल्या क्षणांचा साक्षी होतो. 

|| कृष्णार्पणमस्तू ||











      

Friday, 15 January 2021

Kothaligad

 कोथळीगड declare केला. घोटून पाठ केलेल्या उत्तराचा प्रश्न आला कि जसे आपण पार खांद्या पासून ते नखा पर्यंत हात वर करतो तसे सगळ्यांचे हात वर झाले. सठीसहामाशी पण हक्कानी येणाऱ्या पाहुण्या सारखा पाऊस trek च्या आदल्या दिवशी अचानक बरसला तसा बऱ्याच जणांच्या ट्रेक ला खो बसला. 

'To be or not to be' पण नाही, आणि  'Either Or' ही पण आपली philosophy नाही. आपली philosophy म्हणजे 'बोला तो बोला'. मंग काय, ज्यांनी बुद्धी च ऐकलं त्यांनी हात खाली घेतले आणि ज्यांनी मनाचं ऐकलं ते सुटले डोंगरात. बुद्धी च ऐकणं maturity च लक्षण खर, पण... थँक यू देवा नारायणा मला ती तू कमीच दिलीस, नाहीतर एक सुंदर दिवस निसटला असता. 

भल्या पहाटे सारसबागे पासुन trek चा श्रीगणेशा केला. सगळ्यांना घेऊन पुण्याची वेस ओलांडली. मैफिलीच्या सुरवातीला गळा एक दोनदा खाकरून झाल्यावर जसा सूर लागतो तसा एक्सप्रेस वे ला लागल्या वर गाडीचा सूर लागला. दाट धुक्यानी सगळा आसमंत व्यापला होता. लोहगड-विसापूर चा घेरा सोडला. गाडी घाटात आली आणि डावीकडे तुळतुळीत नागफणी दिसला. कितीदा जरी ह्या रस्त्या वरून गेलो तरी इथून जाताना नजर त्याच्या कडे वळतेच. हिचतर गम्मत आहे सह्याद्री ची. कृष्णा सारखं ह्या सह्याद्रीत पण जन्मजात चुंबकत्व आहे. ज्याच मन त्याच्या प्रेमानी भरलं त्याच्या मनाची राधा होते. म त्याच्या बरोबर असताना सहवासाचं प्रेम आणि त्याच्या पासून लांब असताना विरहाचं प्रेम अनुभवायचं.


सई आणि आनंदी ही दोन बडबडी कासव आज ट्रेक ला होती. "Investment in mutual fund are subject to market risk" ब्ला ब्ला ब्ला... वाल्याचा पण स्पीड कमी पडेल आणि बातम्या देणारा पण बोलून बोलून वैतागेल पण ह्या पोरी सुट्टीच घ्यायला तयार नाहीत. 

कर्जत, आमराई, कडावचा गणपती सोडला आणि कशेळी ला आत शिरलो. बाल्यावस्था, तारुण्य, वार्धक्य ह्या जश्या मानवी शरीराच्या अवस्था तसच झाडाझुडपांच्या बाबतीत पण. श्रावणात तारुण्यानी मुसमुसलेली हिरवी कच्च , पानांनी लगडलेली झाड बऱ्याच अंशी रंगहीन आणि निष्पर्ण झाली होती. पण showoff  करण्याचा आटापिटा नसल्यमुळे रंगहीन आणि निष्पर्ण असून सुद्धा सौंदर्यात तसूभरही कमतरता नव्हती. कदाचित भविष्यात श्रावण येणारच ह्या श्रद्धेपायी आत्ताचे दिवसही त्यांना 'रुमानी' च वाटत असतील. क्या बात है.


नाव, गाव, आवड-निवड, कोण काय काय उद्योग करत वैगरे वैगरे विचारून चालायला सुरवात केली. फाट्या पासून ते पेठवाडी पर्यंत चा रस्ता म्हणजे ९ ते ५ च्या नोकरी सारखा, एकसुरी. आनंदीआणि सई ची टकळी पक्षांना पण बीट करत होती. आज दोघींच्या घरी आणि घरच्यांच्या कानात प्रगाढ शांतता असेल. पण त्यांच्या मूळे ट्रेक live झाला होता. पित्त खवळल्यामुळे सकाळ पासूनच सविताची बॅटरी डाउन होती. सगळे तिला motivate करत होते, सई नी तर अगदी हात धरून तिला वाडी पर्यंत आणलं. 

खरच डोंगर म्हणजे गोंदवलेकर महाराजांच रामबाण औषध सुंठसाखरे सारखं काम करतात. सुंठसाखर जशी शरीरातील अनावश्यक जास्तीच्या घटक कमी करते आणि जे कमी आहे ते भरून काढायला सहाय्यक काम करते तसंच डोंगर शरीरातली extra चरबी आणि मनातला खुजे पणा कमी करायला मदत करतात. तर पहीलं मला, पेक्षा पहिले आप पहिले आप करायला शिकवतात, like-minded भटक्यांची एक टीमच बनवतात. 

उजवीकडचा गावात जाणारा रस्ता  सोडून धुत्या हाताचा रस्ता पकडला. गडाच्या चढणीला लागलो तसा खरा ट्रेक सुरु झाल्याचा फील आला. थांबत, बसत, रेंगाळत, हळूहळू आमची उंची वाढत होती. सगळ्यांच्या patience चे गुडघे टेकायच्या आत सगळे बुरुजा पाशी आलो. रक्तरंजित इतिहासाची साक्ष देत दोन देखण्या तोफा पठारावर दिमाखात उभ्या होत्या. 

कलावंतिणीच्या पायऱ्या मस्त, हरिहर च्या तर नजर ठरत नाही अश्या. पण कोथळीगडाच्या पण नितांत सुंदर. पायऱ्या आणि गुहेतल carving तर नुसत बघत बसाव अस. काय साले हे कारागीर असतील. छिन्नी हातोडीनी चित्रकाराच्या कुंचल्या प्रमाणे दगडांवर नाजूक हातांनी स्ट्रोक मारणारे. विश्वकर्म्याच्याच वंशांतले. 

पायऱ्या संपून चढणीला लागलो. छोटेखानी सुबक दरवाज्याने आणि संरक्षक शरभ शिल्पानी आमच .स्वागत केलं. गड अगदीच छोटा, एका बाणाच्या टप्प्यातला. वर भरपूर फोटो काढून, सभोवार न्याहाळून उतरायला सुरवात केली. आता  सगळयांच्या पोटात कावळे ओरडायला लागले. भुकेनी पायांना आपोआपच गती दिली. अचानक काय हुक्की आली, केतकी आणि मी बूट काढून अनवाणी चालायला सुरवात केली. Natural acupressure. मजा आया. वाटेत एका छोट्या ताई कडे लिंबू सरबत प्यायला बसलो. ईश्वरी ला विचारलं तर म्हणे नको सरबत प्यायलं तर भूकमोड होईल. अरे काय हे. पदरमोड शब्द ऐकला कंबरमोड ऐकला पण भूकमोड ?? आज मराठीला अजून एक शब्द  मिळाला.  सई आणि आनंदी चा भूकमोडीचा संस्कृत शब्द काय होईल ह्या वर खल चालला होता. 

वाडीत मामांकडे मस्त जेवण केलं आणि तडक खाली सुटलो. वेळेत उतरलो तर पांडवलेणी बघण्याचा प्लॅन होता. उतरतोय उतरतोय पण वाट काही संपेना. शाळेतून घरी येताना दगडाचा फुटबॉल करून तो घरा पर्यंत आणायचा हा चाळा होता. म काय, एक मस्त दगड घेतला. मी, केतकी आणि ईश्वरी. मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार झालो. वाटेत आनंदी पण आम्हाला सामील झाली. आमचा फुटबॉल झाडी झुडपात कुठेही गेला तरी त्याला गोलपोस्ट पर्यंत म्हणजे आमच्या गाडी पर्यंत आणलाच. त्यामुळे बोअरिंग रस्ता मजे मे कट गया. लेणी बघूच म्हणून सगळ्यांना राजी केलं, पण नशिबात टाळ बघणं होत. बांधावर थोडा tp करून गाडीत बसलो. duracell मधल्या बाकीच्या सस्यां सारखे सगळे झाले होते. चहाच्या ब्रेक साठी थांबलो पण कॉफी घेतली, अ हा हा, अजूनही जिभेवर तिची चव रेंगाळते आहे. 

Beautiful trek with beautiful souls, thankful to all. Once again. Again and again, thank you thank you thank you. 

अजून एक सुंदर दिवस पदरात टाकलास.         

।। कृष्णार्पणमस्तु ।।


 


Friday, 8 May 2020

Trek with Surendra


निसर्ग अनुभवायला पाहिजे. शहराच्या चार भिंतितराहून नाही, ना कि कोणाच्या लेखणीतून, कोणाच्या कवितेतून वा कोणाच्या अनुभवातून. तर दस्तुरखुद्द निसर्गात जाऊन तो अनुभवायला हवा. 
तिथे गेल्यावर 'जे पिंडी ते ब्रह्मांडी' ची सत्यता कळते. हिमालयाच्या उंच पर्वता मधून वाहणाऱ्या निर्झराच साधर्म्य आहे आपल्या धमन्या तुन वाहणाऱ्या रक्ताशी. पण ह्याची अनुभूती घ्यायला मन ताळ्यावर असल पाहिजे. हिमालयातली रौद्र वादळ अनुभवली कि याद येते मनात उठणाऱ्या भावनांच्या आवेगांची. 'ग्लेशीयर' मधली पडझड शांत चित्तानि ऐकली कि आठवतो पोटातुन येणारा ढापढुप आवाज. हिमालयातल्या डोंगरांचा पसारा प्रतिबिंबित करतो मनातल्या इच्छा आकांक्षान्ना. अस कितीतरी. मारुतीच्या शेपटी सारख, न संपणार. 
कोणा भक्ताला देव दगडाच्या सगुण मूर्तीत दिसेल, कोणी तो निर्गुणात अनुभवू शकेल, कोणाला आई च्या व्यक्त रूपात तो दिसेल तर कोणी नास्तिक तो नसण्यात त्याला पाहिल. पण भटके मात्र त्याला निसर्गाच्या विराट रूपातच पहात असणार. 
निसर्गाला प्रत्येकाची काळजी असतेच. एखाद फुल हिमालयाच्या रुक्ष वातावरणात उमलत, ह्यात अहंकार नाही म्हणूनच त्यात सौंदर्य प्रसवत. माणूसच साला हरामी प्रत्येक गोष्ट ego शी link करत असतो. 
तर, हे कायबाय अनुभवायला पाहिजे. शरीराची आणि मनाची मशागत करून बुड आडवाटेवर न्यायला पाहिजे.